पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून दूषित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने महापौर रवी लांडगे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. दूषित पाण्याबाबत तातडीने उपाययोजना करून स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेश महापौर लांडगे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.
चिंचवडमधील भाटनगर, चिखली, माेशीसह आदी भागात गेल्या काही दिवसांपासून दूषित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा हाेत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्याचे खापर जलसंपदा विभाग, एमआयडीसी, पीएमआरडीए, प्रदूषण नियंत्रण मंडळावर फोडले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत असल्याने त्यांचा फटका शहरवासीयांना बसत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
दूषित पाण्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापाैर लांडगे यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश कावळे, राजेंद्र मोरणकर, दीपक पाटील, महेश बरीदे या वेळी उपस्थित होते.
दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या भागात पाणीपुरवठा विभागाने काय कार्यवाही केली, दूषित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती पदाधिकाऱ्यांनी घेतली. शहरासाठी आंद्रा धरणातील शंभर दशलक्ष लिटर पाणी साठा आरक्षित आहे. आंद्रा धरणापर्यंत महापालिकेने अद्याप भूमिगत जलवाहिनी टाकलेली नाही. त्यामुळे महापालिकेस थेट धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी मिळत नाही.
महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून अशुद्ध पाणी उपसा केला जातो. सध्या तेथून दररोज ९० दशलक्ष लीटर पाणी उचलले जाते. ते पाणी चिखली जलशुद्धीकरण केंद्रात नेऊन त्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य शुद्ध पाणी मोशी, बोऱ्हाडेवाडी, चिखली, डुडुळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडी, चऱ्होली या परिसरातील नागरिकांना दिले जाते. परंतु, या भागातून दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
भामा आसखेड प्रकल्पाचा ठेकेदार बदला
भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. काम संथगतीने सुरू असल्याने ठेकेदार बदलावा. नवीन ठेकेदार नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी, असे आदेश महापौर लांडगे यांनी दिले. या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यास शहराला १६७ दशलक्ष लीटर स्वच्छ पाणी शहराला मिळेल. त्यामुळे निघोजे येथून अशुद्ध पाणी घेण्याची गरज राहणार नाही. आंद्रा पाणी योजना पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबण्याची सूचनाही महापौरांनी केली.
४० टक्के पाणीगळती
सध्या दररोज सुमारे पाच लाख लिटर पाण्याची कमतरता असून ४० टक्के पाणी गळती हाेत आहे. पाणी गळती तात्काळ थांबवावी. जुन्या व जीर्ण पाईपलाईनचे टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करावे. आधुनिक व स्मार्ट मॉनिटरिंग प्रणाली प्रभावीपणे राबवावी. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याची सूचना सभागृह नेते शितोळे यांनी केली.
