पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना नदीवरील रावेत आणि आंद्रा धरणातील इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी अतिशय अशुद्ध आहे. त्यामुळे शिवणेतील बंधाऱ्यातून पाणी उचलण्यात यावे,’ अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली. १८५ किलोमीटर अंतर सांडपाणी वाहिनीतून पिण्याच्या पाण्याची वाहिनी गेल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात खासदार बारणे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्षण गोफणे, शिवसेना (शिंदे) गटनेते विश्वजित बारणे, नगरसेवक नीलेश तरस, नीलेश बारणे, सुलभा उबाळे या वेळी उपस्थित होते.
‘शहरात किती विकास कामे केले, कोणते नवीन मोठे प्रकल्प राबविले यापेक्षा पाणी, स्वच्छता, आरोग्य या मुलभूत सुविधा किती सक्षमपणे दिल्या जातात हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांपेक्षा मुलभूत सुविधा मुबलक प्रमाणात देण्यावर भर द्यावा. नागरिकांना पुरेसे, स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. महापालिकेकडून रावेत बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी अतिशय अशुद्ध आहे. देहूरोड, किवळे भागातील नाले नदीला मिळत आहेत. काही गृहनिर्माण सोसायट्यांमधील सांडपाणीही थेटपणे नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे अशुद्ध पाणी होत आहे. हे ध्यानात घेता शिवणे बंधाऱ्यातून पाणी उचलण्याबाबत चाचपणी करावी. भविष्यात तेथून पाणी उचलावे. अन्यथा सांडपाणी मिश्रित पाणी नागरिकांना मिळेल. आंद्रा धरणातील शंभर दशलक्ष लीटर पाणी निघोजे बंधाऱ्यातून उचलण्यात येते. हे पाणी रावेतपेक्षा अशुद्ध असल्याचे प्रशासन सांगत आहे. त्यामुळे शहराला अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी उपाययोजना कराव्यात,’ अशी सूचना खासदार बारणे यांनी दिल्या.
टँकर बंद करा
शहरातील टँकर बंद करावेत. महापालिकेने पुरेशा दाबाने आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा. १८५ किलोमीटर अंतर सांडपाणी वाहिनीतून पिण्याच्या पाण्याची वाहिनी गेली आहे. त्यामुळे थेट अशुद्ध पाणी नागरिकांना दिले जात आहे. या वाहिन्यांचे तत्काळ स्थलांतरण करण्याची सूचनाही खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
