पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्यासाठी पवना, आंद्रा आणि भामा आसखेड जलवाहिनी योजना मार्गी लावा. पाणीगळती रोखणे आणि सांडपाणी पुनर्वापरावर भर द्या. त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, याबाबतचा दीर्घकालीन आराखडा (मास्टर प्लॅन) १५ दिवसांत सादर करा,’ असे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी प्रशासनाला दिले.

‘पाण्यासाठी नवीन स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. पाण्याची गळती रोखणे गरजेचे आहे. पाणी पाणीपुरवठ्याची कोणती आणि किती कामे करावी लागणार आहेत, त्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे, त्याचा आराखडा तयार करण्याचे प्रशासनाला सांगितले आहे. त्यानुसार नियोजन करून प्राधान्याने पाणीपुरवठ्याची कामे केली जाणार आहेत,’ असे बारणे यांनी सांगितले. स्थायी समितीची नुकतीच बैठक झाली. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले. तसेच, या बैठकीत विविध कामांविषयीचे निर्णय झाले.

कल्पतरू चौकात भुयारी मार्ग

पिंपळे गुरव येथील वाकड ते नाशिक फाटा रस्त्यावर कल्पतरू चौकात भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. त्या कामासाठी सहा सल्लागारांनी भाग घेतला. त्यातील एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. वाहतूक व नागरी नियोजनाच्या दृष्टीने पिंपळे सौदागर येथील पी के चौक वाहतूक दिवे नियंत्रणमुक्त (सिग्नल फ्री) करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करण्यात आली.

विकास आराखडा मराठीत

महापालिकेने सुधारित विकास योजना आराखड्याची (डीपी) पुस्तिका इंग्रजी भाषेत छापली होती. त्यामुळे शहरातील अनेक नागरिकांना आराखड्याची संपूर्ण माहिती प्राप्त झाली नाही. या संदर्भात लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी नगररचना विभागाकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन आराखड्याचे मराठीत भाषांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी चार लाख रुपये शुल्क आहे. ते शुल्क विभागीय सहायक भाषा संचालक कार्यालयास देण्यात येणार आहे.

महापौर चषक कबड्डी स्पर्धा

महापालिकेच्या वतीने नुकतीच राष्ट्रीय स्तर वरिष्ठ व कनिष्ठ गट शरीरसौष्ठव स्पर्धा चिंचवड येथे घेण्यात आली. त्यासाठी २३ लाख रुपयांचा खर्च आला. आता महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानात ६ ते १० मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. त्या स्पर्धेत राज्यातील महिला व पुरुष गटांचे संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी ९९ लाख ५३ हजार ३६० रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चास स्थायी समितीने आयत्या वेळी मंजुरी दिली.

चिखलीत पोलीस ठाण्यासाठी जागा

महापालिकेने चिखली येथे उभारलेल्या घरकुल प्रकल्पात ३० हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. या घरकुलाच्या प्रवेशद्वाराशेजारील १५ गुंठे जागा ४० वर्षांसाठी पोलीस ठाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.