पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी पवना धरणातून १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. अतिरिक्त पाणी उचलण्यास येत्या १५ दिवसांत परवानगी दिली जाईल. याबाबतचा निर्णय जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत झाल्याचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणी प्रश्नावर मुंबईत बैठक पार पडली. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, मुख्य अभियंता रा. अ. कायलवार, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, नगर विकास विभागाचे अवर सचिव शिवाजी चव्हाण, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरीदे या बैठकीला उपस्थित होते.

‘पिंपरी-चिंचवडला दिवसाला ६५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या ३७ लाखांच्या उंबरठ्यावर आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडत आहे. गेल्या सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडे पवना धरणातून शंभर दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. या संदर्भात जलसंपदामंत्री विखे-पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये शहराची पाण्याची आवश्यकता आणि वितरित होणारा पाणीपुरवठा याच्या तुलनात्मक अभ्यासानंतर त्यांनी पवना धरणातून शंभर दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उचलण्याची परवानगी दिली,’ असे आमदार जगताप यांनी सांगितले.

शिरेमध्ये अशुद्ध जलउपसा केंद्र

आंद्रा धरणाचे पाणी शहरात आणण्यासाठी मावळ तालुक्यातील मौजे शिरे येथील ०.९५ हेक्टर जमीन जलसंपदा विभागाकडून कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात आली आहे. येथे अशुद्ध जलउपसा केंद्र, अप्रोच चॅनेल, पंप हाउस आणि सबस्टेशन उभारले जाणार आहेत. यामुळे शहराला अतिरिक्त पाणी मिळण्याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत.

शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता, उपलब्ध पाणीपुरवठा अपुरा पडत होता. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन पवना धरणातून अतिरिक्त शंभर दशलक्ष लिटर पाणी उचलण्यास १५ दिवसांत परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरवासीयांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे, असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.