पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी आणि पाणी शुद्ध करत नसल्याचा ठपका ठेवत आकारलेल्या दंडाची रक्कम थकल्याने महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. थकबाकी भरण्याच्या पहिल्या नोटिशीनंतर महापालिकेने १४३ कोटींपैकी सात काेटींचा भरणा केला. मात्र, उर्वरित १३६ काेटींची थकबाकी ४८ तासांत भरावी. अन्यथा पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल, अशी अंतिम नाेटीस जलसंपदा विभागाने महापालिकेला दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा केला जाताे. पवना नदीवरील रावेत बंधारा येथून महापालिका ५५० दशलक्ष लीटर (एमएलडी) अशुद्ध पाणी उचलते. हे पाणी निगडी, प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. त्यानंतर शहराला पाणी वितरित केले जाते. पवना धरणातील पाण्यासाठी महापालिकेला जलसंपदा विभागाकडून पाणी पट्टीची आकारणी केली जाते.

पाणीपट्टी आणि २७५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया न करता पाणी नदीत साेडले जाते, याबाबतचा दंड अशी १४३ काेटींची थकबाकी झाली हाेती. ही थकबाकी भरण्याबाबत १७ मार्चला जलसंपदा विभागाने महापालिकेला नाेटीस दिली हाेती. त्यानंतर महापालिकेने १९ मार्च रोजी तातडीने सात काेटी रुपयांचा भरणा केला. मात्र, त्यानंतरही १३६ काेटी रुपयांची थकबाकी महापालिकेकडे बाकी आहे. त्यामुळे ही थकबाकी ४८ तासांत भरावी, अन्यथा पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा देणारी अंतिम नाेटीस जलसंपदा विभागाच्या वतीने महापालिकेला देण्यात आली आहे.

जलसंपदा मंत्र्यांचे थकबादीरांवर कारवाईचे आदेश

महापालिकेला थकबाकी भरण्याबाबत वेळोवेळी अवगत करण्यात आले होते. परंतु, पूर्ण थकबाकी भरण्यात आली नाही. जलसंपदा मंत्र्यांनी थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नोटीस मिळताच महापालिकेने ४८ तासांच्या आत संपूर्ण थकबाकी, चालू देयके अदा करावीत. मुदतीत रक्कम न अदा केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा नोटिशीतून दिला आहे.

आयुक्तांची तातडीने अधिकाऱ्यांबरोबर बैठक

अंतिम नाेटीस मिळाल्यानंतर महापालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्याबराेबर मंगळवारी खडकवासला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, उप अभियंता माणिक शिंदे, पवना धरणाचे शाखा अभियंता अजिंक्य पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणीपट्टी आणि दंडाच्या रकमेविषयी माहिती दिली. दाेन दिवसांत थकीत रक्कम भरण्याबाबत सांगितले. यावर आयुक्त डाॅ. सूर्यवंशी यांनी महापाैरांसह पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून जास्तीत-जास्त पैसे अदा करण्याचे आश्वासन दिल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेकडे १४३ काेटींची थकबाकी हाेती. त्यापैकी केवळ सात काेटींचा भरणा केला आहे. त्यानंतरही महापालिकेकडे १३६ काेटी रुपये बाकी आहेत. ही थकबाकी वसूल करण्याबाबत वरिष्ठांच्या सूचना आहेत. त्यानुसार महापालिकेने दाेन दिवसांत थकबाकी जमा करावी. अन्यथा पाणी पुरवठा खंडित केला जाईल, असे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.