पिंपरीत अंत्यविधीचा खर्च महापालिका उचलणार

अंत्यविधी करण्याची देखील ऐपत नाही, अशी कुटुंबे शहरात असल्याचे वारंवार लक्षात आल्यानंतर, अंत्यविधीचा खर्च उचलण्याची तयारी पिंपरी महापालिकेने दर्शवली आहे.

अंत्यविधी करण्याची देखील ऐपत नाही, अशी कुटुंबे शहरात असल्याचे वारंवार लक्षात आल्यानंतर, अंत्यविधीचा खर्च उचलण्याची तयारी पिंपरी महापालिकेने दर्शवली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आल्यानंतर त्यास मान्यता देण्यात आली.
माजी नगरसेवक व स्वराज्य अभियानचे मारुती भापकर यांनी याबाबतची मागणी केली होती. काही भागात अशाप्रकारे अंत्यविधीचा खर्च महापालिका उचलते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर, याबाबतचा विचार पुढे आला व स्थायी समितीने तसा प्रस्ताव तयार केला. पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील विविध धर्म तसेच पंथाचे नागरिक राहतात. अनेकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. अंत्यविधीसारख्या क्षणी त्याचा खर्च पेलण्याची क्षमता नसल्याचे अनेकदा दिसून येते. ही खर्चाची जबाबदारी महापालिका स्वीकारणार आहे, असे याबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. स्थायी समितीने हा प्रस्ताव मान्य केला. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव सभेपुढे मांडण्यात येणार आहे. तेथे मान्यता मिळाल्यानंतर याबाबतची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pcmc will bear expense of funeral rites