पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी व गवळीमाथा येथे राबविण्यात येत असलेल्या ‘शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प’ या उपक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापन प्रभावी आणि शाश्वत पद्धतीने होत आहे. या उपक्रमांतर्गत गेल्या २४ दिवसांत ९१६ टन कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात आले आहे. कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे वर्गीकरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत १ ते २४ मार्च २०२६ या कालावधीत ९१६ टन कचरा संकलन करण्यात आला आहे. यामध्ये ६२०.३८ किलो सुका कचरा, ३.२९ टन ओला कचरा, तसेच २८०.५० किलो सॅनिटरी कचरा संकलित करण्यात आला आहे. याशिवाय ११.९५ किलो घातक घरगुती कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे कचरा विलगीकरण, संकलन आणि विल्हेवाट प्रक्रियेत सुधारणा झाली आहे. या उपक्रमांतर्गत, कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे वर्गीकरण करणे, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती यावर विशेष भर दिला जात असल्याचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले. यामुळे कचरा वाहतुकीवरील खर्च कमी झाला आहे. जागेवरच कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्लास्टिक कचऱ्यासाठी अत्याधुनिक वाहन

‘शहरातील प्लास्टिक कचरा संकलनासाठी आरोग्य विभागाला अत्याधुनिक वाहन देण्यात आले आहे. या वाहनामुळे शहरातील प्लास्टिक कचरासंकलन व प्रक्रिया अधिक वेगवान, कार्यक्षम आणि शाश्वत होईल. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शहर उभारणीच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल,’ असा विश्वास आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी व्यक्त केला.

दापोडी व गवळीमाथा येथील शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक बदल होत आहे. हा उपक्रम शहरासाठी आदर्श ठरत आहे, असे पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे म्हणाले. कचरा व्यवस्थापनात शाश्वत पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प ही संकल्पना प्रभावी ठरत आहे. भविष्यातही अशा उपक्रमांचा विस्तार करण्यात येणार आहे. शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.