पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) कामकाजाकडे बारकाईने लक्ष देत होते. त्याच पद्धतीने बँकेच्या कामकजाकडे लक्ष ठेवणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जाहीर केले.

‘पीडीसीसी’ बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अल्पबचत भवनात झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी माजी गृहमंत्री, बँकेचे ज्येष्ठ संचालक दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,‘बदलाच्या काळात ‘पीडीसीसी’ बँकेच्या विकासासाठी अजित पवार यांनी काही निकष घालून दिले आहेत. आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभारावर त्यांनी नेहमी भर दिला. हेच निकष पुढे कायम ठेऊन बँकेला देशातील अग्रगण्य ग्रामीण सहकारी बँक बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अजित पवार हे बँकेच्या कामकाजाकडे बारकाईने लक्ष देत होते, त्याच पद्धतीने बँकेच्या कामकाजामध्ये लक्ष ठेवणार आहे.’

‘पीडीसीसी’ ही केवळ बँक नसून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सहकाराचा भक्कम आधारवड असलेली ही बँक आहे. अजित पवार यांचा शेतकरी हिताचा विचार, सहकाराचा विश्वास आणि ‘पीडीसीसी’ बँकेची ताकद या त्रिसुत्रीच्या बळावर पुणे जिल्ह्याची ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक समृद्ध करणे आवश्यक आहे. शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम झाली पाहिजे, असा अजित पवार यांचा कायम आग्रह असायचा. हाच विचार ‘पीडीसीसी’ बँकेच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी असायला हवा,’ असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.

‘आम्हाला पुन्हा संधी द्या’

‘बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. धनदांडग्यांच्या हातात सत्ता देऊन चुकीचे माणसे निवडून आल्यास अजित पवार यांच्या स्वप्नांना धक्का बसू शकतो. त्यासाठी चांगले संचालक निवडून पाठविणे आवश्यक आहे. बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे. आम्ही चांगला कारभार केला असेल तर आम्हांला पुन्हा संधी द्या.’ असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले.

पाच लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्‍के दराने

‘शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेती केली पाहिजे. त्यासाठी ऊसामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) धोरण बँकेने स्वीकारून एक हजार कोटींची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने कर्जपुरवठा केला जातो. त्याऐवजी पाच लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्‍के दराने करावे,’ अशी सूचना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.

‘शैक्षणिक कर्जावरील व्याजसवलत पाच टक्के करा’

‘शेतकरी आणि पगादार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्जावरील व्याज सवलत दर चार टक्‍क्‍यांवरुन पाच टक्‍के करावी,’ अशी सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बँकच्या संचालकांना केली. सध्या या बँकेकडून परदेशी शिक्षणासाठी आठ टक्के व्याजदाराने ४० लाखांपर्यंत कर्जपुरवठा केला जातो. शेतकरी आणि पगादार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना चार टक्के व्याजसवलत दिली जाते. त्याऐवजी पाच टक्के व्याजसवलत देण्याची सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.

अजित पवारांच्या हस्ताक्षरातील टिपण

गेल्या वर्षीच्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यानच्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वहीवर स्वहस्ताक्षरात टिपण लिहिले होते. त्यामध्ये बँकेसाठी कोणत्या योजना राबविता येतील, याच्या नोंदी होत्या. ते टिपण दाखवून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वसाधारण सभेत वाचून दाखविले.