एका शेतकऱ्याला शेतात दोन अंडी सापडतात. ती अंडी घरी आणून तो कोंबडीच्या खुराड्यात ठेवतो. कोंबड्या त्या अंड्यांना उब देतात आणि २० दिवसांनी त्या अंड्यातून मोरांच्या पिलांचा जन्म होतो! शेतकऱ्यासह संपूर्ण गाव अचंबित होते. पुढे सर्व मिळून या मोरांचा सांभाळ करू लागतात. गावकऱ्यांचे, बालगोपाळांचे आणि इतरही प्राण्यांचे सवंगडी बनून हे दोन्ही मोर दिवसभर एकत्र राहू लागतात! एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही क्वचित आढळणारी घटना.
चित्रपटातलं कथानक वाटावं अशी घटना!
पुणे जिल्ह्याच्या मावळातील पवन मावळ भागात धान गव्हाण या नावाचं गाव आहे. पाच वर्षापूर्वी याच गावातील हनुमंत कृष्णा कानगुडे या शेतकऱ्याला शेतात ही अंडी सापडली. आकाराने थोडीशी मोठी असलेली अंडी नेमकी कोणत्या पक्ष्याची आहेत, हे त्याच्या लक्षात आले नाही. त्याने ती घरी आणून कोंबडीच्या खुराड्यात ठेवून दिली. कोंबड्या त्या अंड्यांना उब देत होत्या. वीस दिवसांनी जेव्हा अंड्यामधून मोराच्या पिलांनी जन्म घेतला, तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले आणि उलगडाही झाला की, ही अंडी राष्ट्रीय पक्षी मोराची होती.
ग्रामस्थ आणि मोराच्या अनोख्या नात्याची पंचक्रोशीत चर्चा!
गावातील सर्वांनी मिळून मोरांच्या दोन्ही पिलांचे संगोपन सुरू केले. पाणी असो की चणे, शेंगदाणे, गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी असे खाद्य मोरांना गावकऱ्यांकडून देण्यात येऊ लागले. मोरांची वाढ होत होती, तसे त्यांचा गावकरी, महिला, लहानग्यांसोबत घरोबा होत गेला. कोंबड्या, शेळ्या, गायी, म्हशी, बकरी यांच्यासमवेत मोर खेळू-बागडू लागले. नेहमीच्या ओळखीपैकी कोणी आल्यास मोर पिसारा फुलवून थुई थुई नाचत होते. ग्रामस्थांना मोरांचा लळा लागला. घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे मोरांना वागणूक मिळू लागली. मात्र, करोनाच्या तडाख्यात एका मोराचा मृत्यू झाला. सर्वजण हळहळले. त्यामुळे दुसऱ्या मोराची खूपच काळजी घेण्यात येऊ लागली. आज तो दुसरा मोर उत्तम स्थितीत असून सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. गावकऱ्यांच्या या लाडक्या मोराची आणि त्याचा गावात होणाऱ्या पाहुणचाराची अवघ्या पंचक्रोशीत चर्चा आहे.
“हा मोर गावाचा आहे, असे आम्ही मानतो. चार-पाच वर्षांपासून तो आमच्याकडे आहे. सर्वांकडून त्याचा पाहुणचार सुरू आहे. मोराचा कोणाला त्रास नाही की गावकऱ्यांकडून मोराला कोणताही त्रास होत नाही. तो सकाळपासून सर्वत्र मुक्तपणे बागडत असतो. मुलांशी खेळत असतो. सर्वांना मोराचा लळा लागलेला आहे”, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ राजू चंदू घारे यांनी दिली आहे.