पुणे : दुचाकीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून दोघांनी पादचारी तरुणाला बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना मुंढवा भागात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदारा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अशोक शंकर राव (वय ३०, रा. भोईराज सोसायटी, मुंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अशोक यांचा भाऊ सागर (वय २०) याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक बिगारी काम करतात. मंगळवारी (२४ मे) सकाळी ते कामासाठी घरातून बाहेर पडले. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास ते मुंढवा रस्त्यावरुन घरी जात होते. साई फर्निचर दुकानासमोर एका दुचाकीचा धक्का लागल्याने अशोक यांनी दुचाकीस्वार तरुणाला जाब विचारला. या कारणावरुन दुचाकीस्वार तरुण आणि त्याच्या बरोबर असलेल्या एकाने त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि ते रस्त्यावर पडले. त्यानंतर दुचाकीस्वार आणि साथीदार पसार झाले. बेशुद्धावस्थेतील अशोक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई आणि मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही चित्रीकरणात अशोक यांना दुचाकीस्वार आणि त्याच्याबरोबर असलेल्या एकाने मारहाण केल्याचे दिसत आहे. या तपासानंतर दोघां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.