गेल्यावर्षी ९ डिसेंबर रोजी जंगलातला गवा थेट पुण्याच्या कोथरूड भागात रस्त्यावर आला आणि एका अभूतपूर्व नाटक घडले. गव्याच्या मागे लागलेला जमाव, गव्याचे पुण्याच्या रस्त्यावरून वेडेवाकडे धावणे, त्याला सुखरूप मूळ जागी पोहोचवण्याच्या दृष्टीने सारे प्रयत्न (यापुढे- ‘रेस्क्यू’ करण्याचे प्रयत्न) आणि सरतेशेवटी पकडल्यावर गव्याचा दु:खद मृत्यू झाला होता. या घटनेला वर्ष उलटल्यानंतर आता या घटनेचे प्रायाश्चित करण्यासाठी कोथरुडमधील निसर्ग व प्राणी प्रेमी मित्र परिवार आणि चेंज इंडिया फाऊंडेशनकडून प्रायश्चित सभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रायश्चित सभेचे फ्लेक्स कोथरुडमध्ये लावण्यात आले आहेत.

गेल्यावर्षी ९ डिसेंबर रोजी गवा कोथरूड भागात रस्त्यावर आला आणि एका अभूतपूर्व नाटक घडले. गव्याच्या मागे लागलेला जमाव, गव्याचे पुण्याच्या रस्त्यावरून वेडेवाकडे धावणे, त्याला सुखरूप मूळ जागी पोहोचवण्याच्या दृष्टीने सारे प्रयत्न सुरू झाले होते. दोरीच्या मदतीनेही गवा ताब्यात येत नव्हता. गव्याला इंजेक्शन देण्यात आले तरी देखील वन कर्मचाऱ्याच्या अधिकार्‍यांना गव्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं नव्हतं. गवा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारची दाद देत नव्हता. त्यामुळे जाळीच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दुपारी गव्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला शांत करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आलं. पण यानंतर त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, कोथरुडमधील डावी भुसारी कॉलनी येथे ही सभा ९ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेचं फेसबुक लाईव्ह देखील करण्यात येणार आहे. “प्राणी जंगलातून शहरात आले तर लोकांनी त्यांना पळवून मारु नये, घरात राहून त्याला त्याच्या अधिवासात जायला मदत करावी ही जनजागृती करण्यासाठी ही प्रायश्चित सभा आयोजित केली आहे,” असं प्राणी प्रेमी सचिन धनकुडे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

तसेच ”आपण आपल्या पूर्वजांच्या श्रद्धांजली सभा आयोजित करतो, वर्षश्राद्ध घालतो. तसं हा गवा देखील माझ्या कुटुंबातील एक घटक होता. त्याला आम्ही जनता, प्रशासनाने पळवून पळवून मारला. दरवर्षी पुण्यस्मरण दिन आयोजित करुन जनजागृती करणार आहोत. तसंच प्रशासनाने देखील असा एखादा प्राणी मानवी वस्तीत आला तर लोकांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे याबाबत नियम करायला हवेत,” असंही सचिन धनकुडे म्हणाले.