रिंगरोडमध्ये ज्यांची घरे जाणार आहेत अशा हजारो नागरिकांनी शुक्रवारी प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी चिंचवड आणि वाल्हेकरवाडी या नागरिकांनी पालखी काढत अनोख्या  पद्धतीने आंदोलन केले. भरपावसात कार्यालयाच्या बाहेर बसून भजन कीर्तन करत नागरिकांनी रिंगरोडला विरोध दर्शवला. नियोजित रिंग रोडसाठीचा तब्बल ३० किलोमीटर रस्ता हा पिंपरी-चिंचवडमधून जाणार आहे. परिणामी  यात अनेक नागरिकांची घरे जमीनदोस्त होणार आहेत. पिंपरी चिंचवड मधील होणारा रिंगरोडचा वाद पुन्हा उफाळून आल्याचे पाहायला मिळाले.

रिंगरोडमध्ये हजारो लोकांची घर जाणार असून रिंगरोडला विरोध करण्यासाठीहजारो नागरिकांनी पालखी काढत अनोखे आंदोलन केले. रिंग रोड जर झाला तर हजारो कुटुंब रस्त्यावर येतील. त्यामुळे हा रिंगरोड होऊ नये, अशी मागणी नागरिक करत आहेत. त्यासाठी पर्यायी उपलब्ध रस्त्याचे मार्गाचा सरकारने विचार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.  रिंगरोडवरील अनधिकृत बांधकाम असणारे हजारो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तसेच यामध्ये असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला. पालखी सोहळा सुरु असल्याचा धागा धरत, टाळ मृदूंग घेऊन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढला. भजन-कीर्तन करून घरं न पाडण्यासाठी नागरिकांनी विठुरायाच्या चरणी साकडे घातले. नागरिकांच्या मागण्यासंदर्भात प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार खडके यांना निवेदन देण्यात आले.⁠⁠⁠⁠