पुणे : पुण्यात कुटुंब नियोजनात महिलांच्या तुलनेत पुरुष खूप मागे असल्याचे समोर आले आहे. गेल्या चार वर्षांत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण केवळ ३ टक्के आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असूनही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांची संख्या वाढत नसल्याचे चित्र आहे.

पुण्यात २०२१-२२ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत एकूण ३१ हजार ९७० महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात २०२१-२२ मध्ये ६ हजार ४१२, २०२२-२३ मध्ये ८ हजार १६५, २०२३-२४ मध्ये १० हजार २२४ आणि एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ७ हजार १६९ महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली. त्याच वेळी २०२१-२२ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत १ हजार ५६ पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया झाली. त्यात २०२१-२२ मध्ये ९९, २०२२-२३ मध्ये २५४, २०२३-२४ मध्ये ३६२ आणि एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ३४१ शस्त्रक्रिया झाल्या, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

गेल्या चार वर्षांतील विचार करता महिलांच्या तुलनेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण अत्यल्प आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पुरुष नसबंदी मोहीम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या पुरुषास १ हजार १०० रुपये मोबदला दिला जातो. तसेच, त्याच्याबरोबर येणाऱ्या नातेवाइकास २०० रुपये मोबदला देण्यात येतो. त्याचबरोबर या योजनेच्या प्रसिद्धीसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. एवढे करूनही प्रत्यक्षात नसबंदी करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण वाढताना दिसत नाही.

पुरुषी मानसिकता कारणीभूत

मातृत्व ही केवळ स्त्रीची जबाबदारी आहे, अशी दृढ धारणा आपल्या समाजात आहे. त्यामुळे तिने जन्म दिला म्हणजे कुटुंब नियोजनाची जबाबदारी तिचीच आहे, असे मानले जाते. त्याचबरोबर पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत अनेक गैरसमज आहेत. शस्त्रक्रियेमुळे आपल्या पौरुषत्वाला धोका होईल, अशी भीती पुरुषांमध्ये असते. वस्तुस्थिती जाणून न घेता पुरुषांकडून नसबंदी शस्त्रक्रिया टाळली जाते. याबाबत समाजात जास्तीत जास्त जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे निरीक्षण फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे शाखाप्रमुख डॉ. प्रवीण सोनावणे यांनी नोंदविले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या वतीने पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया मोफत केली जाते. आरोग्य विभागातील परिचारिकांकडून याबाबत जनजागृती केली जाते. नसबंदी करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका