‘ऑक्टोबर हीट’पासून कायमची सुटका?

मोसमी पावसाचा मुक्काम आता नेहमीच लांबण्याचा अंदाज 

(संग्रहित छायाचित्र)

ऑक्टोबर महिन्याच्या काहिलीपासून आपली कायमची सुटका होण्याची चिन्हे आहेत. वातावरणातील बदलामुळे  गेल्या काही वर्षांत पावसाचा मुक्काम वाढत असल्याने नव्या अंदाजानुसार ‘ऑक्टोबर हीट’ यापुढे जाणवणारच नसल्याचा हवामान तज्ज्ञांचा होरा आहे. मोसमी वाऱ्यांचा देशातील विविध भागांतील प्रवेश आणि माघारी फिरण्याच्या नव्या अंदाजित तारखा हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केल्या, त्यातून ही बाब समोर आली.

गेल्या काही वर्षांमध्ये मोसमी पावसाच्या प्रवासात झालेला बदल लक्षात घेऊन हवामान विभागाने मोसमी वाऱ्यांच्या देशातील प्रवासाच्या अंदाजित नव्या वेळा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. नव्या अंदाजित वेळा ठरविण्यासाठी गेल्या पन्नास वर्षांतील मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाचा अभ्यास करण्यात आला. अलीकडच्या काही वर्षांमध्ये जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा कालावधी संपल्यानंतरही मोसमी वाऱ्यांचा प्रवास ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरू असल्याचे दिसून येत आहे. परिणामी अंदाजित तारखांमध्येही त्यानुसार बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती पाहिल्यास पूर्वीच्या अंदाजित तारखांनुसार राज्याच्या विविध भागांमध्ये ८ ते १० जूनच्या दरम्यान मोसमी वाऱ्यांच्या आगमनाचा कालावधी देण्यात आला होता. नव्या तारखांनुसार आता ८ ते १६ जून दरम्यान मोसमी वाऱ्यांच्या आगमनाची अंदाजित तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आगमनाचा कालावधीही काही भागांत सहा दिवसांनी वाढला आहे. यंदाही मोसमी वाऱ्यांच्या आगमनाबाबत हीच स्थिती दिसून आली. राज्यातून मोसमी वारे निघून जाण्याचा कालावधीही अंदाजित तारखांमध्ये वाढविण्यात आला आहे.

परतीचा नवा कालावधी..

पूर्वीच्या तारखांनुसार २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत मोसमी वारे राज्यातून निघून जाणे अपेक्षित होते. मात्र, वातावरणातील बदलत्या स्थितीनुसार आता ही तारीख ६ ते १२ ऑक्टोबपर्यंत वाढविण्यात आली आहे.

पुणे, मुंबईत दहा दिवसांचा विलंब

मोसमी वाऱ्यांचा पुणे आणि मुंबईतील प्रवेश पूर्वीच्या वेळांनुसार अनुक्रमे ८ आणि १० जूनला होता. तो आता १० आणि ११ जून असा झाला आहे. पाऊस माघारी जाण्याची वेळ या दोन शहरांमध्ये ३० आणि २८ सप्टेंबर, अशी होती. ती आता ९ आणि ८ ऑक्टोबर म्हणजेच १० दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. औरंगाबाद आणि नागपूरमध्येही नव्या अंदाजित तारखांनुसार मोसमी वारे निघून जाण्याचा कालावधी सुमारे १० दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे.

भविष्यात काय?

*  हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार भविष्यातही महाराष्ट्रामध्ये मोसमी पावसाचा मुक्काम लांबणार आहे.

* राज्याच्या कोणत्याही भागांतून सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरचा पहिला आठवडा ते पंधरवडय़ापर्यंत मोसमी पाऊस माघारी जाणार नसल्याचे स्पष्ट झाले.

* परिणामी यंदाप्रमाणे थंडीपूर्वीचा ‘ऑक्टोबर हीट’चा प्रचंड उकाडय़ाचा कालावधी भविष्यात नेहमीच वगळला जाण्याची शक्यता आहे.

यंदासारखेच.. यंदा

कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे मोसमी वाऱ्यांचा प्रवास आणखी लांबला आणि राज्याच्याकाही भागांतून ते २८ ऑक्टोबरला निघून गेले. त्यामुळे ऑक्टोबर हीटचा कालावधी वगळला जाऊन थेट थंडीची चाहूल लागली. यापुढेही तसेच होण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Permanent release from the october heat abn

ताज्या बातम्या