पुणे : शहरात बांधकाम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतल्यानंतर उत्खनन करण्यासाठी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. त्याचा परवाना मिळण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी महापालिकांचे सर्व परवाने जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘महाखनिज’ या पोर्टलशी जोडण्यात आले आहेत. याची सुरुवात झाली असून, महापालिकेने बांधकाम करण्याचा अर्ज मान्य केल्यानंतर गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठीची परवानगी ऑनलाइन मिळणार आहे.
महापालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध परवाने दिले जातात. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महापालिका हे परवाने देते. महापालिकेची परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर कामाला सुरुवात करताना उत्खनन केले जाते. तेथून निघणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज द्यावा लागतो. यामध्ये अनेकदा विलंब होतो. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.
महापालिकेने बांधकाम करण्याची परवानगी दिल्यानंतर त्याची माहिती महाखनिज संकेतस्थळावर मिळणार आहे. त्यानंतर ऑनलाइन परवाना संबंधित व्यावसायिकाला मिळणार असल्याचे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले. याची सुरुवात करण्यात आली असून, महापालिकेची आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणा एकमेकांशी जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘उत्खननातील गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना दिलेला सांकेतिक क्रमांक, तसेच ज्या वाहनातून त्याची वाहतूक केली जाणार आहे, त्याचा क्रमांक टाकल्यानंतर वाहतुकीची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालय ऑनलाइनच देणार आहे. परिणामी, बांधकाम व्यावसायिकांच्या वेळेची बचत होणार आहे,’ असेही वाघमारे यांनी सांगितले.