एनडीए गेट-आळंदी पीएमपीचा नवा मार्ग
पुणे : लोकप्रतिनिधींच्या आग्रहावरून ग्रामीण भागात लांब पल्ल्याचे नवे बसमार्ग सुरू करण्याचा पीएमपीचा अट्टाहास कामय राहिला आहे. एनडीए गेट ते आळंदी असा लांब पल्ल्याचा मार्ग पीएमपीकडून मंगळवारी सुरू करण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पीएमपीकडून सेवा पुरविण्यात येत असली तरी त्याचा परिणाम शहरातील दैनंदिन संचलनावर होत आहे. विशेष म्हणजे लांब पल्ल्याच्या मार्गामुळे गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाढला असून तो पीएमपीला पेलावा लागत आहे.
एनडीए गेट, उत्तमनगर, माळवाडी, कर्वे रस्ता, डेक्कन, शिवाजीनगर, मुळा रस्ता, विश्रांतवाडी, दिघी, मॅगझीन चौक, चऱ्होली फाटा, आळंदी असा मार्ग असेल. सध्या या मार्गावर एक गाडी उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवाशांचा प्रतिसाद आणि उत्पन्न वाढल्यानंतर मार्गावरील गाडय़ांची संख्या वाढविण्यात येणार आहे. एनडीए गेट येथून आळंदीकडे जाण्यासाठीची पहिली गाडी सकाळी सहा वाजता तर शेवटची गाडी सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. आळंदी येथून पहिली गाडी ७.५० मिनिटांनी तर शेवटची गाडी ५.५ वाजता सुटेल. कोंढवे धावडे, उत्तमनगर, शिवणे या भागातील नागरिकांना पीएमपीची सेवा उपयुक्त ठरेल, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.
गेल्या सव्वा वर्षांत शहराला लागून असलेल्या तालुक्यांमधील नागरिकांच्या सोयीसाठी पीएमपीच्या माध्यमातून ३५ नवे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. या नव्या मार्गामुळे ३५० लहान गावे, खेडी आणि वस्त्या शहराला जोडण्यात आल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण भागात पीएमपीची सेवा देताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दैनंदिन सेवेवर त्याचा परिणाम होत आहे.
या दोन्ही शहरातील नागरिकांसाठी आधीच गाडय़ांची संख्या अपुरी असताना ग्रामीण भागात गाडय़ा सोडण्यात येत असल्याने शहरातील प्रवासी सेवेवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. या ग्रामीण भागातील गाडय़ा लांब पल्ल्याच्या असल्याने देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्चही पीएमपी प्रशासनाला करावा लागत आहे. मात्र उत्पन्न मिळत असल्याचा दावा करत ग्रामीण भागात नवे मार्ग सुरू करण्याबरोबर मार्गाचे विस्तारीकरण पीएमपी प्रशासनाकडून केले जात आहे. लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांच्या मागणीनुसार ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.