पुणे : ‘कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) पारंपरिक शिक्षणाच्या चौकटी निखळल्या. आता शिकण्याची प्रक्रिया सतत करण्याची गोष्ट झाली आहे. डिजिटल साक्षर नसलेली व्यक्ती निरक्षर समजली जाते. त्याचप्रमाणे ‘एआय’चा वापर माहिती नसलेली व्यक्तीही निरक्षरच समजली जाईल. आता ‘एआय’च्या वापराला पर्याय नाही,’ असे मत पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

जनसेवा फाउंडेशनतर्फे ‘भेटू या एका दिग्गजाला’ या उपक्रमांतर्गत डॉ. आनंद देशपांडे यांच्याशी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संचालक दीनानाथ खोलकर यांनी संवाद साधला. त्या वेळी देशपांडे बोलत होते. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, मीना शहा, राजेश शहा, सोनाली आनंद देशपांडे, नितीन कोठारी, कांचन श्रॉफ या वेळी उपस्थित होत्या.

डॉ. देशपांडे म्हणाले, ‘देशातील अनेक समस्या अद्याप अनुत्तरित आहेत. कित्येकांपर्यंत आपण पोहोचलोही नाही. मात्र, ‘एआय’मुळे या समस्यांवर उपाय शोधता येतील. संशोधनाला चालना मिळेल. ‘एआय’मुळे उत्पादकता वाढेल, अधिक गुणवत्तापूर्ण काम करणे शक्य होईल. मात्र, त्याच्यावरील अवलंबित्व वाढल्याने आपण काही मूलभूत कौशल्ये विसरणार आहोत. हे खरे असले, तरी आपण नवीन कौशल्येही अवगत करणार आहोत. त्यामुळे २०३५ मध्ये बाजारपेठेत कोणते नवीन तंत्रज्ञान येणार, हे आत्ता २०२५ मध्ये सांगता येत नाही. त्यासाठी २०३३ सालापर्यंत वाट पाहावी लागेल.’

‘आपल्याकडे शिक्षणामध्ये एकसुरीपणा आहे. त्याच त्याच प्रकारचे शिक्षण सर्व अभ्यासक्रमांमध्ये दिले जाते. आंतरविद्याशाखीय असे काही प्रत्यक्षात नसते. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांना आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विषयांचे शिक्षण घेण्यात अडचण येते. याउलट विदेशात बहुआयामी शिक्षण आहे. शिक्षणाचे प्रतिबिंब व्यक्तिमत्त्वामध्ये पडते. त्यामुळे शिक्षणही बहुआयामी, खऱ्या अर्थाने आंतरविद्याशाखीय असायला हवे,’ असेही त्यांनी नमूद केले.

फाउंडेशनचे विश्वस्त जे. पी. देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

‘उद्योग उभारा’

‘सध्याच्या काळात प्रत्येकानेच नोकरीच्या मागे न लागता नवकल्पनांचा आविष्कार करून उद्योग-व्यवसायात स्थान निर्माण करायला हवे. पाच लोकांच्या सोबतीने मी कंपनी सुरू केली. कर्मचाऱ्यांमध्ये ‘माझी नाही, तर आपली कंपनी’ हा संदेश पोहोचवला. कंपनी उभी करताना कर्मचाऱ्यांसमोर एक ध्येय ठेवावे लागते. ध्येय असले, की माणसे आपोआप जोडली जातात. उद्योगात यश मिळवण्यासाठी सांघिक भावनेने काम करणे अत्यंत गरजेचे असतेे,’ असा कानमंत्र पर्सिस्टंट सिस्टीमचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांनी विद्यार्थी, नवउद्यमींना दिला.