scorecardresearch

लखनवी जातीच्या पेरूचा हंगाम सुरू!

काही वर्षांपासून पेरूच्या मागणीत वाढ होत आहे. अनेकजण आवर्जुन पेरूचे सेवन करतात.

 

दररोज बारा हजार किलोंची आवक

पेरूचा हंगाम सुरू झाला असून गुलटेकडी येथील घाऊक फळबाजारात दररोज बारा हजार किलो पेरूंची आवक होत आहे. आवक वाढल्याने पेरूचे दर आवाक्यात आले आहेत.

महाराष्ट्रात पेरूची लागवड अहमदनगर जिल्ह्य़ातील शिर्डीजवळ असलेल्या राहता गावात मोठय़ा प्रमाणात केली जाते. या भागातील उत्पादक लखनवी जातीच्या पेरूची लागवड करतात. पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर, बारामती भागातील काळीज गावात पेरूची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. काळीज गावातून पिंक तैवान जातीच्या पेरूची लागवड केली जाते. पिंक तैवान जातीच्या पेरूचा गर गुलाबी असतो. लखनवी जातीचा पेरू आकाराने मध्यम असतो आणि तो चवीलाही गोड असतो.

पिंक तैवान जातीच्या पेरूपेक्षा लखनवी पेरूला चांगली मागणी असते. श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळबाजारात दररोज राहता तसेच बारामती, इंदापूर भागातून ४०० ते ६०० कॅरेट (प्लास्टिक जाळी) पेरूची आवक सुरू आहे. एका कॅरेटमध्ये साधारणपणे वीस किलो पेरू बसतात, अशी माहिती फळबाजारातील पेरूचे व्यापारी सुनील बोरगे यांनी दिली.

काही वर्षांपासून पेरूच्या मागणीत वाढ होत आहे. अनेकजण आवर्जुन पेरूचे सेवन करतात. फळबाजारात वीस किलो पेरूला ५०० ते ६०० रुपये असे दर मिळत आहेत. पेरूचा हंगाम साधारणपणे महिनाभर सुरू राहील. फळबाजारातून गोवा, रत्नागिरी, महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा येथे पेरू विक्रीसाठी पाठविला जात आहे. परगावात साधारणपणे दररोज २०० कॅरेट पेरू विक्रीसाठी पाठविले जातात.

गोव्यात पेरूची बर्फी

पेरूच्या फोडींची भाजी केली जाते. गेल्या काही वर्षांपासून पेरूचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळा, महाविद्यालयांबाहेर पेरूची विक्री केली जाते. नाताळाच्या पाश्र्वभूमीवर गोव्यातील मिठाई विक्रेते पेरूची बर्फी तयार करतात. त्यासाठी तयार पेरूचा वापर केला जातो. तयार पेरूतील गराचा वापर बर्फीत केला जातो. आईस्क्रीम तसेच पल्प उत्पादकांकडूनही पेरूला चांगली मागणी असल्याचे फळबाजारातील व्यापारी सुनील बोरगे यांनी सांगितले.

पावसामुळे पेरूच्या उत्पादनावर परिणाम झाला. थंडी वाढली की पेरूचे उत्पादन वाढते. वातावरणातील उष्मा वाढल्यानंतर पेरूच्या प्रतवारीवर परिणाम होतो. यंदा थंडी चांगली पडली तर पेरूचा हंगाम चांगला होईल तसेच दरही चांगले मिळतील.

– संतोष नजन, पेरू उत्पादक शेतकरी, राहता, जि. अहमदनगर

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Peruvian season of lucknow breed started akp

ताज्या बातम्या