मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड. अशा महिलांच्या सौंदर्यस्पर्धामध्ये भारतीय सौंदर्यवतींनी आपला ठसा उमटवला आहे. मात्र, आता मांजरांच्या सौंदर्यस्पर्धेतही पुणेकर मांजरीला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (पेटा) या संस्थेने जागतिक स्तरावर घेतलेल्या स्पर्धेत पुण्यातील ‘मेलडी’ या मांजरीला तृतीय क्रमांक मिळाला आहे.
‘पेटा’ या संस्थेतर्फे भटक्या किंवा प्राण्यांच्या अनाथालयातून दत्तक घेतलेल्या मांजरांची स्पर्धा घेण्यात आली. ‘इन्टरनॅशनल होमलेस अ‍ॅनिमल डे च्या (१६ ऑगस्ट) निमित्ताने ही स्पर्धा घेण्यात आली होती. पुण्यातील तृप्ती मुळजकर या मेलडीच्या पालक आहेत. वर्षभरापूर्वी रस्त्यावरून मुळजकर यांनी काही आठवडय़ांच्या मेलडीला घरी आणले. कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे ती जखमी झाली होती. सध्या गेले वर्षभर ही मांजर मुळजकर यांच्याकडे आहे. प्राणी विकत घेण्याएवजी अनाथ प्राणी दत्तक घेण्याकडे प्राणिप्रेमींचा कल वाढावा या उद्देशाने ‘पेटा’ने ही स्पर्धा घेतली होती. भोपाळ मधील सामिया अहमद यांची ‘मुची’ ही मांजर आणि हैदराबाद येथील नेहा किरण यांच्या ‘लुसी’ या मांजरीलाही या स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे.