पुणे : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार, या चर्चेने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, सध्या तरी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर या संघर्षाचा परिणाम होणार नाही. काही काळ वाट पाहावी लागेल,’ अशी भूमिका तेल तज्ज्ञांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली.
‘देशातील तेल कंपन्यांकडे अजून काही महिने पुरेल इतका तेलसाठा आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांसमोर रांगा लावू नयेत,’ असे आवाहन ‘ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशन’कडून करण्यात आले आहे.
‘इराण-इस्रायलमध्ये पेटलेल्या युद्धामुळे पश्चिम आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इराण, इराक, सौदी अरेबिया, अबुधाबी, कुवेत, कतार या देशांमधून मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यात केली जाते. हे देश तेलाचे दर ठरवणाऱ्या तेल उत्पादक संघटनेचे, ‘ओपेक’चे सदस्य आहेत. आखातात निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर पर्यायाने देशातील तेलाच्या पुरवठ्यावर होतो. सोमवारी, एका दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती सुमारे सात टक्क्यांनी वाढल्या. भारतावर होणारे परिणाम लगेच सांगता येणार नाहीत. त्यासाठी काही काळ वाट पहावी लागेल,’ अशी भूमिका देशातील प्रख्यात तेलतज्ज्ञ श्रीकृष्ण देशपांडे यांनी मांडली.
‘देशात सुमारे ८८ टक्के कच्चे तेल आणि सुमारे ५० टक्के नैसर्गिक वायूसाठी आपण आयातीवर अवलंबून आहोत. गेल्या काही वर्षांत भारताने या आयातीसाठी वेगवेगळे पर्याय निवडले आहेत. पश्चिम आशियाबरोबरच रशिया, अमेरिका आणि आफ्रिका इत्यादी देशांकडून आपल्याला तेलाचा पुरवठा होतो. त्यामुळे एका प्रदेशातील तणावामुळे लगेच पुरवठा संकट निर्माण होईल, असे सध्या तरी दिसत नाही,’ असे निरिक्षण ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’चे माजी अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांनी नोंदवले.
‘जागतिक बाजारपेठेतील तेलपुरवठा मुबलक आहे. मात्र, वाहतुकीचा प्रश्न आहे. सध्या होर्मुझ या सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते. या भागात तणाव वाढला की, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे परिणाम दिसतात. ‘रिस्क प्रीमियम’ वाढतो आणि दर वाढण्याची शक्यता निर्माण होते,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘६ ते १२ आठवडे वाट पाहावी लागेल’
‘चीन इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. या तणावाच्या काळात भारतासह चीनलाही इतर पर्याय शोधावे लागणार आहेत. त्यामुळे रशियासारखा तेल निर्यातदार कोणत्या देशाला किती मदत करतो, यावर आगामी काळातील अनेक समीकरणे उदयास येतील,’ असे श्रीकृष्ण देशपांडे यांनी सांगितले.
कच्च्या तेलाचा स्रोत, वाहतूक खर्च आणि रिफायनिंग प्रक्रियेचा विचार करता आंतरराष्ट्रीय दरवाढीचा परिणाम भारतात साधारण ६ ते १२ आठवड्यांनी दिसू शकतो. त्यामुळे तत्काळ दरवाढ होईल, असे गृहीत धरणे योग्य नाही,’ असे श्रीकांत माधव वैद्य यांनी नमूद केले.
सध्याचे दर (३ मार्च)
– पेट्रोल…१०४.२४ – १०४.३६
– डिझेल…९०.३४ – ९०.९८
पेट्रोल पंपावर रविवारी गर्दी
मुख्य रस्ते आणि उपनगरातील पेट्रोल पंपांवर वाहनचालकांनी रविवारी (१ मार्च) मध्यरात्री बाराच्या सुमारास रांगा लावल्या. मात्र, ‘काही महिने पुरेल इतका तेलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लाऊ नयेत,’ असे आवाहन ‘ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन’च्या वतीने राष्ट्रीय प्रवक्ते अली दारुवाला यांनी केले.
