महिनाभरात पेट्रोल, डिझेल पाच रुपयांनी महागले

खासगी वाहनांची संख्या सर्वाधिक असलेल्या पुणे शहरामध्येही पेट्रोलचे दर नव्वदीच्या दिशेने चालले आहेत. पेट्रोल डिलर असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार २० सप्टेंबरला पुण्यात पेट्रोलचा प्रतिलिटर दर ८९.४० रुपये, तर डिझेलचा दर ७७.१० रुपये होता. मागील महिनाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच महिन्यामध्ये पेट्रोलचा दर १० रुपयांनी, तर डिझेलचा दर १५ रुपयांनी कमी होता.

यंदाच्या मे महिन्यामध्ये पुण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा उच्चांक झाला होता. या कालावधीत पेट्रोल ८६ रुपयांपर्यंत, तर डिझेलचा दर ७२.५० रुपयांपुढे पोहोचला होता. याच कालावधीत वाहतूकदारांनी मालवाहतूक आणि खासगी प्रवासी बसच्या भाडय़ामध्ये वाढ केली होती. मात्र, इंधनाच्या सध्याच्या दरांनी सर्व मे महिन्यातील उच्चांकासह दराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मे महिन्यातील उच्चांकी वाढीनंतर जूनपासून इंधनचे दर प्रतिलिटर सुमारे तीन ते चार रुपयांनी खाली आले होते. मात्र, त्याचा लाभ नागरिकांना फार काळ मिळाला नाही. जुलैनंतर पुन्हा इंधनाची दरवाढ सुरू झाली.

जुलैच्या मध्यावर पेट्रोल ८४.१७, तर डिझेल ७१.५४ रुपये लिटर होते. एक महिन्यापूर्वी म्हणजे २० ऑगस्टला पुण्यात पेट्रोल ८४.८० रुपये, तर डिझेलचा दर  ७२.०५ रुपये होता. याच कालावधीत इंधनाच्या दरांचा भडका उडाला असून, एक महिन्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तब्बल पाच रुपयांची वाढ नोंदविली गेली. मागील वर्षी याच महिन्यामध्ये पेट्रोल ७९ ते ८० आणि डिझेलचा दर ६१ ते ६२ रुपये होता. त्यात सध्या अनुक्रमे १० आणि १२ रुपयांची वाढ झाली आहे. दोन्ही इंधनाच्या दरांमध्ये दररोज काही पैशांनी वाढ नोंदविली जात असल्याने पुण्यातही पेट्रोल प्रतिलिटर ९० रुपयांपुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. अकार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि शहरांतर्गत प्रवासाची गरज म्हणून खासगी वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. या सर्व वाहन मालकांना सध्या पेट्रोलच्या दरवाढीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्याचप्रमाणे डिझेलच्या वाढीने वाहतूकदारांच्या व्यवसायावर संकट आल्याने पुन्हा दरवाढीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. रिक्षा, ट्रक, बस वाहतूकदार संघटनेच्या वतीने या दरवाढीबाबत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.