या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

परिवहन मंत्र्यांच्या निर्णयावर पुण्यात जोरदार चर्चा

दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसल्यास त्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नसल्याच्या परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाला पुणे पेट्रोल डिलर असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे. या निर्णयाची सक्ती पंपावर नको, अशी ठाम भूमिका असोसिएशनने घेतली आहे. दरम्यान, या निर्णयाची हेल्मेट सक्तीला सातत्याने जोरदार विरोध करणाऱ्या पुणेकरांमध्ये गुरुवारी जोरदार चर्चा सुरू होती. दुचाकींची संख्या सर्वाधिक असलेल्या पुणे शहरात अनेकांनी नेहमीप्रमाणे हेल्मेट विरोधाचा सूर काढला.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या घोषणेनुसार हेल्मेट घातले नसल्यास पेट्रोल मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध करताना पुणे पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले, की ‘‘पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच पुण्यात हेल्मेटला विरोध करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हेल्मेटबाबत पेट्रोल पंपांची संख्या तीनशेच्या आसपास आहे. हेल्मेटशिवाय पेट्रोल न देण्याचे ठरविल्यास पंपांवर गोंधळ होऊन व्यवसायावर परिणाम होईल. त्यामुळे पंपधारकांच्या व्यवसायाच्या ठिकाणी असा नियम घालणे चुकीचे असल्याने त्यास आमचा विरोध आहे.’’

दरम्यान, सध्या दुचाकी चालविणाऱ्याबरोबरच मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. पोलिसांकडून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर अनेकदा कारवाईची विशेष मोहीम राबविली आहे. मात्र, प्रत्येक वेळेस पुण्यातून त्याला तीव्र विरोध झाला आहे. त्यामुळे सध्या केवळ हेल्मेटलसाठी कारवाई न करता वाहन कायद्याच्या दुसऱ्या गुन्ह्य़ात पकडल्यास संबंधिताकडून हेल्मेटबाबतचा दंडही घेतला जातो. आता पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्तीचे करण्यात येणार असल्याने या निर्णयाच्या विरोधात उभे राहण्याची तयारीही काहींनी सुरू केली आहे. हेल्मेट वापरण्यास भाग पाडण्यासाठी अशा उपाययोजनांची गरज असल्याचे मतही काहींनी व्यक्त केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol pump operators opposed to divakar rawate decision
First published on: 22-07-2016 at 03:45 IST