पीएच.डी. मार्गदर्शकांच्या नेमणुकाही नियमबाह्य़

नियमांची पत्रास न बाळगता पीएच डीच्या मार्गदर्शकांची (गाईड्स) नेमणूक करण्यात येत असल्याचे चित्र समोर आले असून त्याबाबतची कागदपत्रे ‘लोकसत्ताला’ मिळाली आहेत.

सर्वाधिक पीएच. डी. देणाऱ्या आणि दर्जेदार विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. देताना मात्र नियम, गुणवत्ता या अशा मुद्दय़ांना केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. नियमांची पत्रास न बाळगता पीएच डीच्या मार्गदर्शकांची (गाईड्स) नेमणूक करण्यात येत असल्याचे चित्र समोर आले असून त्याबाबतची कागदपत्रे ‘लोकसत्ताला’ मिळाली आहेत. विशेष विद्यापीठातील अधिष्ठाते, अधिकारी या नियमभंगात आघाडीवर आहेत.
पुणे विद्यापीठ हे गुणवत्ता आणि संशोधनासाठी ओळखले जाते. विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही अनेक विशेष योजना आणि निधी विद्यापीठाला मिळाला आहे. विद्यापीठाकडून संशोधन केंद्रांना नियमबाह्य़ पद्धतीने देण्यात आलेल्या मान्यता, आयोगाचे नियम मोडून देण्यात आलेल्या पदव्या, अभ्यासक्रम पूर्ण करताना शिक्षकांकडूनच केली जाणारी बनवाबनवी अशा अनेक बाबी ‘लोकसत्ता’ ने गेले काही दिवस समोर आणल्या आहेत. याबरोबरच पीएच डीच्या मार्गदर्शकांच्या (गाईड्स) नेमणुकाही नियमांची पत्रास न बाळगता केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे ज्यांनी पीएचडी देताना निकषांचे पालन होते का हे पाहायचे ते विद्यापीठाचे अधिष्ठाते आणि अधिकारीच आघाडीवर आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार पीएचडी मार्गदर्शक हा गुणवत्तेच्या निकषांची पूर्तता करण्याबरोबर पूर्ण वेळ मान्यताप्राप्त शिक्षक असणे आवश्यक असते. मात्र अर्ध वेळ काम करणाऱ्या शिक्षकांना, शिक्षणक्षेत्रात नसलेल्या व्यक्तींनाही पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात आल्या आहेत. एका ठिकाणी नोकरी करताना दुसऱ्या शहरातील संशोधन केंद्रात पूर्ण वेळ मार्गदर्शक असल्याचे दाखवून मानधन घेणारे शिक्षकही आहेत. यामध्ये काही अधिष्ठात्यांचाही समावेश आहे. एखादा मार्गदर्शक अध्यापक म्हणून कार्यरत नसेल तर त्याच्याकडील विद्यार्थ्यांना दुसरा मार्गदर्शक देणे बंधनकारक आहे. मार्गदर्शक सहायक घेण्याची तरतूदही फक्त तंत्रज्ञान विद्याशाखेला असल्याचे दिसत आहे. मात्र नियम बाजूला ठेवून वर्षांनुवर्षे बनवाबनवी करणाऱ्या या मार्गदर्शकांना दरवर्षी विद्यार्थीही दिले जात आहेत.
बीसीयूडींकडूनही नियमभंग?
पीएच डीचे प्रवेश आणि सर्व प्रक्रियेवर महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाकडून (बीसीयूडी) नियंत्रण ठेवण्यात येते. मंडळाच्या संचालकांच्या हाती पीएच डी संबंधी अनेक बाबींची मान्यता असते. महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्याकडूनच नियमबाह्य़ पद्धतीने पीएच डीच्या विद्यार्थ्यांना गाईड म्हणून काम करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. बीसीयूडी हे विद्यापीठातील पूर्ण वेळ अधिकारी पद आहे. या पदावर काम करत असणाऱ्या व्यक्तीला पूर्ण वेळ शिक्षक म्हणून गृहित धरले जात नाही. डॉ. गायकवाड यांनी जून २०१२ मध्ये बीसीयूडी पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांच्याकडे रसायनशास्त्र विषयात पीएच डी करणारे सात विद्यार्थी आहेत. असे असतानाही नुकतीच त्यांनी पीएच डीची एक जागा रिक्त असल्याचेही विद्यापीठाला कळवले आहे. याबाबत डॉ. गायकवाड यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘मी आधी घेतलेल्या विद्यार्थ्यांची पीएच डी पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. मी रिक्त जागा दाखवल्या असल्या तरीही नवे विद्यार्थी घेतलेले नाहीत.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ph d guide appointment illegal

ताज्या बातम्या