मेट्रोचा पहिला टप्पा मार्चअखेरपर्यंत पूर्ण; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती|phase one of metro completed by march end minister chandrakant patil information pune | Loksatta

पुणे: मेट्रोचा पहिला टप्पा मार्चअखेरपर्यंत पूर्ण; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केल्यानंतर गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक येथे पाहणी करून तिकीट घेत वनाज स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास पाटील यांनी केला.

पुणे: मेट्रोचा पहिला टप्पा मार्चअखेरपर्यंत पूर्ण; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

पुणे मेट्रोचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होईल. मेट्रोच्या तीन टप्प्यांनाही गती देण्यात येत असून त्यातील २ टप्प्यांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील ८५ किलोमीटर लांबीचा प्रकल्प अहवाल महापालिकेकडून होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मेट्रोच्या जाळ्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मेट्रो प्रकल्पाच्या कामांची पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली. शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केल्यानंतर गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक येथे पाहणी करून तिकीट घेत वनाज स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास पाटील यांनी केला. आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यावेळी उपस्थित होते. शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केल्यानंतर डॉ. दीक्षित यांच्यासह पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचे संगणकीय सादरीकरण केले.

हेही वाचा: खळबळजनक! पिस्तुलातून गोळ्या झाडत कोयत्याने केले वार, पिंपरीत सिनेस्टाईल भर चौकात एकाचा खून

पाटील म्हणाले, शहराची वाढती गरज पाहता रस्ते, उड्डाणपूल आदी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर शहरातील गर्दी मेट्रोमध्ये स्थलांतरीत होईल. पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू असून ३३ किलोमीटर लांबीचा पूर्ण एक टप्पा मार्च २०२३ पर्यंत महामेट्रोकडून पूर्ण करण्यात येईल. प्रवासी वाहतूक गतीने होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्रत्येक स्थानक वेगवेगळ्या संकल्पनेनुसार तयार करण्यात आले. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडणार आहे.

हेही वाचा: पुणे: सोसायट्यांमधील पाणीगळती थांबवा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

शिवाजीनगर एसटी बस स्थानकाखाली बहुउद्देशीय वाहतूक केंद्रासाठी भूमिगत स्थानक बनवण्यात आले असून एसटी, रेल्वे स्थानक, पीएमपीएल आणि हिंजवाडी मेट्रो मार्गिकेशी जाेडण्यात येणार आहेत. ऐतिहासिक बांधकामांच्या प्रतिकृतीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण संरचना या बांधकामात वापरण्यात आल्या आहेत, अशी माहिती मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 11:45 IST
Next Story
खळबळजनक! पिस्तुलातून गोळ्या झाडत कोयत्याने केले वार, पिंपरीत सिनेस्टाईल भर चौकात एकाचा खून