पिंपरी : फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात मंगळवारी आणखी एका रुग्णाचा वायसीएम रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दारू प्रकरणातील मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे, ससून रूग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रूग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

प्रफुल्ल अरिकस्वामी (वय २७) असे मृत्यू झालेल्या रूग्णाचे नाव आहे. फुगेवाडी येथील आरोपी कर्नेलसिंह याच्याकडील विषारी दारू पिल्याने आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या श्रीमंत कोळी (वय ६०) आणि प्रकाश राठोड (वय ६५) या दोन रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. जितू शेदातपुरी (वय ३१), सोनू तायडे (वय वय ३०) या दोघांची तसेच, औंध जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या चंदन कुमार (वय २६), खाजप्पा शिंगे (वय ३५) आणि पवन चव्हाण (वय ३५) यांची प्रकृती स्थिर आहे. सुभाष डिग्गीकर (वय ६६) यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयात उपचार घेणार्‍या अस्लम खान (वय ४०) यांना मंगळवारी रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. ते त्यांच्या मुळ गावी भुसावळ गेले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिली.

अवैध दारूवर कारवायांची मोहीम सुरूच; सलग चौथ्या दिवशी ११ ठिकाणी कारवाया पिंपरी-चिंचवड पोलिसांची अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर सातत्याने कारवाई सुरु आहे. दापोडी येथील विषारी दारूकांड झाल्यानंतर पोलिसांनी या मोहिमेला गती देत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. सलग चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. सोमवारी (१ जून) शहरातील विविध भागात कारवाया करत पोलिसांनी दोन लाख ३९ हजार ६७० रुपयांची दारू जप्त केली.

चाकण उत्तर आणि बावधन येथे प्रत्येकी दोन, संत तुकाराम नगर, दापोडी, सांगवी, भोसरी, पिंपरी, दिघी, चाकण दक्षिण येथे प्रत्येकी एक कारवाई झाली. यामध्ये दोन महिलांसह एकूण १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवायांमध्ये दोन लाख ३९ हजार ६७० रुपये किमतीची देशी दारू आणि १६ रमच्या बाटल्या जप्त केल्या. चाकण उत्तर परिसरात एका भट्टीवर कारवाई झाली. त्यात पोलिसांनी ३५० लिटर रसायन नष्ट केले.

संत तुकाराम नगर, भोसरी परिसरात दारूची वाहतूक केली होती. ही वाहतूक रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. पिंपरी मधील भाटनगर येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने घरातच दारू भट्टी लावली असल्याचे उघडकीस आले. त्याच्या ताब्यातून साडेआठ हजार रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. आरोपीने गॅस शेगडीवर मोठ्या कढईमध्ये दारूभट्टी लावली होती. पोलिसांनी ही दारूभट्टी उध्वस्त केली आहे.