पुणे : ‘फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावा, ही महाराष्ट्राची भावना आहे. त्यांच्या महान कार्याचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी विधानसभेने केंद्र सरकारकडे एकमताने शिफारस केली आहे,’ असे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या ‘ज्ञानाई ज्ञानशिल्प’ या भित्तीचित्रांचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते. या वेळी शिल्पकार नवीन शेगंबर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, ‘महिला विज्ञान, प्रशासन, संरक्षण, शेती, अंतराळ या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, याच्या मुळाशी सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष आहे. फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे. नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘ज्योती-सावित्री’ अभ्यास शाळा उभारण्यात आली आहे.’
‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर हा केवळ इतिहास नाही, तर तो महाराष्ट्राचा आत्मा आहे. आपल्या वर्तमानाचा पाया आहे. हा वारसा अजितदादांनी आपल्या कारकिर्दीत जपला. पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्यात फुले दाम्पत्याचे राष्ट्रीय स्मारक उभे राहावे, यासाठी दादांनी पाठपुरावा केला आणि विशेष निधी दिला,’ असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
‘‘लेक लाडकी’, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, मोफत उच्च शिक्षण याद्वारे राज्य सरकार महिलांना सक्षम करत आहे. महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख देणारे ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी सक्षमीकरण’ धोरण हा क्रांतिकारी निर्णय आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
‘विद्यापीठात उभारण्यात आलेली ज्ञानाई ज्ञानशिल्पे केवळ कलाकृती नाहीत. ती शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देतात. ही शिल्पे आता विद्यार्थी आणि नागरिकांना पाहण्यासाठी खुली असतील,’ असे कुलगुरू डॉ. गोसावी यांनी सांगितले. डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आभार मानले.
‘सावित्रीची लेक असल्याचा अभिमान’
‘मराठवाड्यातील एका छोट्या गावात, शेतकरी कुटुंबात जन्मलेली मुलगी आज राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री होऊ शकली, याचे श्रेय सावित्रीबाईंनी पेटवलेल्या ज्ञानज्योतीचेच आहे,’ अशी भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
‘३० मिनिटांत परवानग्या’
‘विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यास आठ वर्षे लागली. त्यासाठी २४ परवानग्या लागणार होत्या. या परवानग्या मिळवण्यासाठी दोन वर्षे लागतील, असे वाटत होते. मात्र, तत्कालीन पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी त्या ३० मिनिटांत मिळवून दिल्या. छगन भुजबळ यांनीही स्मारकासाठी पाठपुरावा केला,’ अशी माहिती राजेश पांडे यांनी दिली.
