हडपसर येथील बांधकामाच्या जागेवर काल दुपारी पावणे तीनच्या सुमारास गाडीच्या सावलीखाली झोपलेल्या चिमुरडीचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

रेखा लक्ष्मण बजंत्री (वय-६ महिने, रा. बी. टी. कवडे रोड, नारायणबाग), असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. या प्रकरणी रेखाच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पिकअप गाडीचा चालक लाला राजपूत (रा. केशवनगर, मुंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका ठिकाणी लक्ष्मण बजंत्री हे त्यांच्या पत्नीसह मजुरीचे काम करतात. काल दुपारी पावणेतीनच्या सुमारास सहा महिन्यांच्या चिमुरडीला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाजवळ उभ्या असलेल्या पिकअपच्या मागील बाजूस असलेल्या सावलीमध्ये त्यांनी झोपवले होते. ते कामास तेथून गेले. काही वेळानंतर पिकअप गाडीचा चालक आल्यावर त्याने गाडी मागे घेत असताना रेखाच्या डोक्यावरून चाक गेले. त्यामुळे जागीच तिचा मृत्यू झाला. या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास करण्यात येत आहे.