पाचवी-सहावीत शिकणाऱ्या दोन लहान मुलांचे भांडण. त्यात चूक कोण नि बरोबर कोण, कोणत्याही घटनेची दोन टोके कायम ठरलेली. या दोन टोकांना जोडणाऱ्या ‘कॉरिडॉर’मध्ये काय घडते, ते खरे कथानक असते. या पोकळीत अनेक शक्यता उभ्या राहतात. भांडण का झाले असेल, मुले काय लपवतायेत, वगैरे वगैरे. आई-बापाचे नाजूक दुखणे, त्यांना बरोबर माहिती असते. कुणाला काय सांगायचे, नि कुणापासून काय, कसे लपवायचे, याचे फंडेही त्यांना ठाऊक असतात. त्यामुळे अशा शक्यतांचा ‘कॉरिडॉर ऑफ व्हायोलन्स’ भांडणाच्या गोष्टीतून निर्माण होतो.
इराणी दिग्दर्शक मकन अशौरी यांनी ‘कॉरिडॉर’ या सिनेमामधून भांडणाच्या घटनेतील दोन टोकांमधल्या शक्यतांचा अवकाश उभा केला. त्यात समाजातले मूलभूत प्रश्न टिपले. सगळीकडे घडणाऱ्या भांडणाच्या घटना कमी-अधिक प्रमाणात सारख्याच. फरक पडतो, तो या अवकाशात. आपण हा ‘कॉरिडॉर’ आणि तो टिपणारी नजर हरवतोय का? सगळीकडे टोकं जोडण्याची घाई दिसते. निकाल लावून मोकळे होऊ या एकदाचे, गुंतायचे नसतेच कुणाला. असा समाज वाळवंट होणार नाही, तर काय, असे सवाल उभे राहतायेत.
विजय तेंडुलकरांसारखा अचाट हिमतीचा लेखक मराठीने पाहिला. टोकं जोडून मोकळे होणाऱ्यापैकी तेंडुलकर नाहीत. त्यांच्याकडे मधला अवकाश टिपण्याची नजर नि त्यातील कथानक सांगण्याचे कसब होते. माणसामधली जनावरापेक्षाही भयंकर क्रूरता, त्याचे शेकडो पदर दाखवण्याची हिंमत त्यांच्याकडे होती, पण तेव्हाच्या समाजाला पचेल इतके सोपे तेंडुलकर नव्हते. म्हणून विरोधही झाला. वाद घडले. पण, ‘शांतता ! कोर्ट चालू आहे’, ‘घाशीराम कोतवाल’ इत्यादी इत्यादी. तेंडुलकरांनी सांगणे सोडले नाही. चौकटींना हादरे दिले. अशी हिंमत आता दुर्मीळच. ‘सध्याच्या कांदबऱ्या, साहित्यातून आशय हरवतो आहे. साहित्यच सकस नसल्याने त्यावर बेतलेले सिनेमेही सुमार होतात. एकाच प्रकारची गोष्ट पुन:पुन्हा सांगितली जाते,’ अशा शब्दांत प्रसिद्ध तमिळ कादंबरीकार आणि पटकथा लेखक बी. जयमोहन यांची सुमारीकरणाविषयीची चिंता व्यक्त झाली.
‘‘एआय’ येते आहे. त्याचा वापर काही तांत्रिक बाबींसाठी होतो आहे. मात्र, गोष्ट सांगण्याचे माणसाचे कसब, मानवी मूल्ये त्यात कशी अवतरणार? सच्चेपणानेच सकस निर्मिती होते,’ असा सल्लाही त्यांनी दिला. जयमोहन यांच्या उत्तरावर एका सिनेप्रेमीने केलेला, ‘नामवंत संस्थांकडून ‘एआय’च्या वापरावरील कार्यशाळेचा’ उल्लेख नव्या शक्यतांची दुसरी बाजू खुली करणारा ठरला.
‘तंत्रज्ञान बदलत असते आणि त्याचा वापरही. पण, ते फार महत्त्वाचे नसते. प्रत्येक समाजाची विचार करण्याची पद्धत असते. घटना-घडामोडींकडे पाहण्याची आपली एक नजर असते. त्यातूनच सिनेमासारख्या कलाकृती आकार घेतात. प्रत्येक समाजाचे एक सांस्कृतिक पर्यावरण असते. हवेचे, पाण्याचे प्रदूषण होते, तसेच सांस्कृतीचा अवकाशही दूषित होतो. त्याचा परिणाम सिनेेमे-साहित्य आदी सगळीकडेच दिसतो. सध्या निवडूनही सगळे सारखेच असल्याची प्रतिक्रिया उमटते. आपल्याकडे माध्यम साक्षरताच नाही. त्यामुळे निवडीचे स्वातंत्र गमावलेल्या या समाजात गोंधळ उडतो आहे,’ अशी टिपण्णी समर नखाते करतात.
‘सिनेमाला मी लोकशाही म्हणतो. समाजातले सगळे काही, नागडे सत्य कॅमेरा टिपतो. ते कशा प्रकारे सादर करायचे, हा ज्याच्या-त्याचा प्रश्न. काहीसे सकस द्यायचे, तर सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध हवे. जगभरातील उत्तमोत्तम साहित्य, सिनेमे इथे यायला हवेत. शेवटी, या पर्यावरणासाठी ज्याने-त्याने आपापल्या परीने प्रयत्न करावेत,’ असा सल्लाही नखाते सर देतात. ‘पिफ’मधून हाच प्रयत्न करत असल्याचेही ते आवर्जून सांगतात.
‘पिफ’ आज संपेल. पण, सकस सांस्कृतिक पर्यावरणासाठी नवे प्रयत्न उभे राहतील का, हे पाहणे महत्त्वाचे. शेवटी, समाजाचे वाळवंट होऊ नये, म्हणून ‘पिफ’च्या शेवटाकडे जाणारा हा दिवस महत्त्वाचा.
आजचे चित्रपट
- द लाइट दॅट नेव्हर गोज् आउट : सकाळी १०.१५ (पीव्हीआर)
- इंटर्नल झीरो : सकाळी १०.०० (पीव्हीआर)
- डिस्को आफ्रिका : दुपारी १२.४५ (पीव्हीआर)
- फादर, मदर, सिस्टर, ब्रदर : दुपारी १२.३० व १.०० (पीव्हीआर), दुपारी १२.१५ व १२.४५ (ई-स्क्वेअर) (हा समारोपाचा चित्रपट आहे.)
