हिटलरने पोलंडवर आक्रमण केले, नि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. आता पहिल्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम पाठ करून थकलेल्यांना इतिहासाच्या पुस्तकात अजून एक धडा मिळाला. घटना-घडामोडींची जंत्री वाढली. नि ठरलेल्या सामाजिक-आर्थिक-राजकीय उत्तरांचे रकानेही. त्यात आजच्या प्रश्नांची उत्तरे कालच्या वर्तमानात शोधायला गेलेले नापासच. कुतूहल कायम असलेले मात्र मोठ्या पडद्यावर या युद्धांचे परिणाम अनुभवयाला गर्दी करतात. मानवी इतिहासातला भयंकर नरसंहार, असुरी महत्त्वाकांक्षेचे असंख्य बळी आणि सगळ्याच युद्धांतून निर्माण होणारा मूल्यांचा गोंधळ, हरवलेले बालपण… युद्ध म्हणजे अशी यादी वाढणारच.
आताही युद्ध सुरूच आहे. कदाचित अधिक व्यापक पातळीवर. कदाचित अधिक भयंकर. समाजिक चौकटींची उलथापालथ हेलावून टाकते आहे. पाकळ्या गळून पडलेल्या माना मोबाइलच्या स्क्रीनवर नवे अवकाश शोधतायेत. भाषा, वंश, लिंग, वर्ग आदी चौकटी ० आणि १ मधल्या विस्तीर्ण डिजिटल अवकाशात नवे तारांगण शोधातायेत. गुहेतून बाहेर पडलेल्या माणसाला जसे कुतूहलाने पछाडले असेल, तशीच अवस्था या नव्या अवकाशात होते. काही तरी हलते आहे, काही तरी घडते आहे, या घुसळणीतून एक नवी नजर आकाराला येते आहे. त्यातून मानवी मनाचे अत्यंत अंधारे, संवेदनशील कोपरे शोधले जातायेत. सिनेमाच्या पडद्यावर याचे प्रतिबिंब न उमटते तर नवलच.
ही घुसळण भाषेची गुलाम नाही. कुतूहलाची भूक भागवायला चित्रे पुरेशी ठरतात. भावनेची धग धर्म, वंश, जात, नि भाषेसारख्या खुज्या भिंती सहजच ओलांडते. पुण्यातली पोरं-पोरी इराणी, युरोपीय सिनेमांसाठी रांगा लावतात. तर, मराठी सिनेमा विदेशी पाहुण्यांकडून कौतुकाची थाप मिळवतात. ‘पिफ’च्या चौथ्या दिवशी बदलाचा हा टप्पा अधिक तीव्रतेने जाणवला. इराणी दिग्दर्शक जफर पहाणीचा ‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’ असो, की जर्मनीच्या फातिह अकिनने मांडलेला ‘अमरूम’; ‘पिफ’च्या पडद्यावर असे कल्पनेच्या पलीकडचे अचाट सिनेमे दाद मिळवतात.
रोज सिनेमा पाहायचा कंटाळा येतो म्हणून, जरा सायकल टूरकडे चक्कर मारायला जाणारी पावले, ‘पिफ’मधून बाहेर पडत नाही. सिनेमा झाला, की चर्चा, चर्चासत्रे नि कार्यशाळांचे अनुभव गोळा करण्यात वेळ कसा जातो, हे कळत नसल्याची प्रतिक्रिया जाणते जन देतात. उत्तरे मिळोत की, न मिळोत, प्रश्न पडले पाहिजेत. नि त्याहीपेक्षा सिनेमात बुडून जायचा आनंद लुटण्यासाठी इथे गर्दी जमते. ठरलेला मसाला नि भव्यदिव्य दीपवून टाकणारे सिनेमे सोडून चौकटीबाहेरचे, काहीशा वेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येक पडद्याबाहेर तासन् तास रांगा लागतात. या रागांमध्ये होणाऱ्या ‘आज काय बघितलं, हा सिनेमा भारीच होता नि हा नसता बघितला तरी चाललं असतं, तो अजून चांगला होता…’ अशा गप्पांमधूनही नव्याने जन्मू पाहत असलेल्या कुतुहलाची कुजबूज कानी येते.
जगभरातील सिनेप्रेमींच्या मेळ्यात हरप्रकारचे कुतुहल शमवण्याची संधी पुणेकरांना मिळते आहे. सिनेमाच्या गोष्टीबरोबर निर्मितीच्या तंत्राबद्दल हातचे काही ठेवले जात नाही. ‘तुंबाड’सारखा अचाट सिनेमा देणारा राही अनिल बर्वे असो, की ललित प्रभाकरसारखा प्रथितयश अभिनेता, इथे सगळ्यांच्याच वाट्याला प्रश्न येतात. इस्रायली दिग्ददर्शक डॅन वॉलमन, सर्बियाचे गोरान राडोवानोविच असे पाहुणे खास आकर्षणाचे केंद्रबिंदू. नवख्या पोरांचे प्रश्नही नम्रतेने ऐकण्याची, त्याला योग्य प्रतिसाद नि धीर देण्याची त्यांची हातोटी, गर्दीचे नियोजन करणाऱ्यांच्या कामी येते. नि सिनेसृष्टीतल्या उमेदवारांसाठी त्यांचे एखादे वाक्य मोलाचा सल्ला ठरतो. त्यामुळे उत्तरे मिळो, न मिळो प्रेमाचा परतावा दिलाच जातो. शेवटी, कोलाहलातून कुतुहलाकडे नि कुतुहलातून निर्मितीच्या शक्यता खुला करणारा चौथा दिवस ‘पिफ’च्या यशातील मध्यांतरचा टप्पा म्हणून विशेष.
आजचे चित्रपट
- रूदाली : सकाळी १०.२५ (पीव्हीआर)
- हिस्टेरिआ : सकाळी १०.१५ (ई-स्केअर)
- मुक्काम पोस्ट बोंबिववाडी : दुपारी १२.३० (पीव्हीआर)
- ड्रीम ऑफ लिबरेशन : दुपारी २.४५ (पीव्हीआर)
- स्पाइंग स्टार्स : दुपारी १२.१५ (ई-स्केअर)
- लॉस्ट लँड : सायंकाळी ५.२० (ई-स्केअर)
- कार्यशाळा : उद्याचे आवाज – मराठी चित्रपट स्पर्धेतील निर्माते-दिग्दर्शकांशी संवाद : दुपारी ३.१५
