पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी गावात बालिकेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध ६३३ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
पिंपळवंडी गावातील एका साडेनऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपी साहिल खैरे (वय २५) याला अटक करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी २० दिवसांत आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. जुन्नरचे उपविभागीय अधिकारी धनंजय पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळे फाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी आरोपीविरुद्ध पुरावे संकलित केले.
‘या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय, न्यायवैद्यकीय, तांत्रिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे ६३३ पानी आरोपपत्रात जोडण्यात आले. तपासात नवीन साक्षीदार समोर आले असून, त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. आरोपीविरुद्ध गावात नाराजीचे वातावरण होते. मात्र, तशी तक्रार ग्रामस्थांनी यापूर्वी पोलिसांकडे केली नव्हती’, असे पोलीस अधीक्षक संदीपसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अद्याप या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली नाही. आरोपीला कठोर शिक्षेची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी जलदगतीने तपास करुन आरोपीविरुद्ध १५ दिवसांत आरोपपत्र दाखल केले होते.
