पिंपरी : बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच निगडीत असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या खेळाच्या शिक्षकाने या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच शाळेतील तेरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. या शिक्षकाला निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे. तर एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह ट्रस्टचा अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
निवृत्ती देवराम काळभोर (रा. औंदुबर निवास, साई हौसींग सोसायटी, गुरुद्वारा, चिंचवड) या शिक्षकासह किर्ती शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, लि साोफिया एज्युकेशन सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभिम जाधव, अविंद्र अंकुश निकम, गोरख सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि शुभांगी अशोक जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, लक्ष्मण नामदेव हेंद्रे हा पसार आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा – धक्कादायक ! दहावीतील विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारात हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
निगडी येथे लि साोफिया एज्युकेशन सोसायटीचे किर्ती विद्यालय आहे. या शाळेत पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी काळभोर हा शाळेत खेळाचा शिक्षक आहे. काळभोर हा पीडित मुलीस वारंवार लैंगिक त्रास देत असे. पीडित मुलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पिटीच्या क्लाससाठी ग्रांउडवर घेवून जात व येत असताना पीडित मुलीशी अश्लील चाळे करीत असे. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितला तर ‘तुला लय मारीन’ अशी धमकी देत असे. २१ ऑगस्ट रोजी पीडित मुलगी ही शौचालयातून बाहेर येत असताना काळभोर याने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन केले. अखेर मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
हेही वाचा – पुणे : बदलापूर अत्याचार घटनेनंतर शाळा, महाविद्यालयातील प्रतिनिधींची बैठक
आरोपी निवृत्ती काळभोर याच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये काळभोर हा न्यायालयातून जामिनावर बाहेर आला होता. तरीसुद्धा त्याला शाळा व्यवस्थापनाने पुन्हा शाळेत नोकरी दिली. त्यामुळे शिक्षक निवृत्ती काळभोर याच्यासह शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, तसेच, ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास जाधव यांच्यासह इतर आरोपींना निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे.