पिंपरी : देशभरातील नागरिकांना इनव्हेस्टमेंट फ्रॉड आणि ऑनलाइन टास्कच्या जाळ्यात ओढून तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य ‘म्युल अकाउंट’ पुरवठादार आरोपीला आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीच्या नऊ बँक खात्यांमध्ये सायबर गुन्ह्यांतील १ कोटी १५ लाख रुपयांचे संशयित व्यवहार आढळून आले आहेत.

सचिन संजय काळे (२५, मोशी) असे आळंदी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत आळंदी पोलीस ठाण्याच्या सायबर सेलने ही धडक कारवाई केली. मोशी येथील गोडाऊन चौकाजवळून सचिन काळे याला ताब्यात घेण्यात आले. एका बँकेच्या आळंदी शाखेतील बचत खात्याचा वापर ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सचिन याने स्वतःच्या नावे वेगवेगळ्या नऊ बँकांमध्ये खाती उघडली होती. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीची रक्कम जमा झाली आहे. या खात्यांवर आलेली रक्कम सचिन एटीएम आणि धनादेशाद्वारे काढत होता. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल वरील माहितीनुसार, या रॅकेटद्वारे देशातील ६५ नागरिकांची १५० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सचिन काळे विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याच्या खात्यावर एक कोटी १५ लाख रुपये रक्कम घेतली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सायबर गुन्हेगार आर्थिक आमिष दाखवून नागरिकांची बँक खाती आणि सिमकार्ड भाड्याने किंवा वापरासाठी घेतात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले बँक खाते किंवा एटीएम वापरू देऊ नका. अनोळखी स्त्रोताकडून आलेले पैसे ऑनलाइन स्वीकारून ते रोख स्वरूपात काढून देणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी केले आहे.

दुचाकीचोरी करणारी टोळी अटकेत

दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला बावधन पोलिसांनी अटक केली. परया कारवाईत तीन आरोपींसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी आणि २४ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. या तपासातून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले.

पोलीस पथक म्हाळुंगे-नांदे रस्त्यावर गस्त घालत असताना दुचाकीवरुन जाणारा एक तरुण पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. संबंधित दुचाकीला क्रमांक नव्हता. तसेच वाहनाच्या कागदपत्रांविषयी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दुचाकीच्या इंजिन आणि चेसिस क्रमांकाची तपासणी केल्यानंतर ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित तरुणाची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हिंजवडी परिसरासह विविध ठिकाणांहून दुचाकी आणि मोबाइल संच चोरी केल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिल लहू जाधव (२०), वसंत अंकुश जाधव (२५) आणि सुनील लहू जाधव (२५) यांच्यासह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील चार, हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन आणि शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण सात चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्यांना अटक; २३ दुचाकी जप्त

मौजमजेसाठी दुचाकी चोरून गरज संपल्यानंतर सोडून देणाऱ्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. तिघांकडून १५ लाख ५० हजाराच्या रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ज्ञानेश्वर शंकरराव जैसवाल (४६), वेदप्रकाश मदनसिंग रावत (३५, ताथवडे), संतोष मोहन मांगीलवाड (२८, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस वाहन चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते. वाहन चोरी होणाऱ्या घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती माहितीचे विश्लेषण केले. त्याआधारे संशयितांना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता वाहनचोरीचे अनेक गुन्हे समोर आले. या तपासातून वाकड पोलीस ठाण्यातील चार, आळंदी मधील सहा, चाकण मधील तीन, संत तुकारामनगर, शिक्रापूर तसेच रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण १७ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी ज्ञानेश्वर जैसवाल याच्याकडे मिळालेल्या आठ दुचाकींच्या मालकांचा शोध सुरु आहे. आरोपी ज्ञानेश्वर हा खासगी वाहनांवर बदली चालक म्हणून काम करतो. तो मौजमजेसाठी दुचाकी चोरत होता. आवश्यकता संपल्यानंतर चोरी केलेली दुचाकी कुठेही पार्क करायची. पुढे जेव्हा गरज लागेल तेव्हा दुसरी दुचाकी चोरायची, अशा पद्धतीने तो वाहन चोरी करित होता.