पिंपरी प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी स्वस्तातील घरांचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. गुरूवारी (११ फेब्रुवारी) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम होणार असताना शहर भाजपने त्यात खोडा घातला आहे. आधीपासून राहणाऱ्या नागरिकांना पुरेशा नागरी सुविधा द्या, त्यानंतर नव्याने घरे बांधा, अशी मागणी भाजपने केल्याने प्राधिकरण प्रशासनासमोर पेच निर्माण झाला असून त्यावर पालकमंत्र्यांनाच तोडगा काढावा लागणार आहे.
पेठ क्रमांक ३०-३२ येथे उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे गुरूवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आहे. दिलीप कांबळे, विजय शिवतारे, डॉ. रणजित पाटील हे मंत्रीही या वेळी उपस्थित राहणार आहेत. मात्र, या कार्यक्रमास विरोध करत नामदेव ढाके, राजेंद्र साळुंके, शेखर चिंचवडे आदी भाजप कार्यकर्त्यांनी सभामंडपाचे काम थांबवले. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांची भेट घेऊन, आधी नागरी सुविधांची कामे पूर्ण करा, त्यानंतरच नवीन घरांचा प्रकल्प सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात ढाके म्हणाले,‘‘गरिबांच्या घरांना विरोध नाही. मात्र, या परिसरात ७० हजाराची लोकवस्ती आहे. येथे पुरेशा नागरी सुविधा नाहीत. उद्यान, मैदान, दवाखाने नाहीत. मोकळ्या जागांवर नागरिकांसाठी आवश्यक कामे करावीत, अशी मागणी सातत्याने करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आधीच्या नागरिकांना पुरेशा सुविधा नसताना नव्याने घरे बांधण्यात येत आहेत. त्यामुळे वस्ती आणखी वाढेल आणि नागरी समस्यांचा विषय आणखी तीव्र होईल.’’