पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजप आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील वाढती गटबाजी, मतभेद उघडकीस आल्यानंतर आगामी काळात संघटना आणि पालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी टाळण्यासाठी, पक्षाअंतर्गत शिस्तीसाठी शहर अनुशासन समितीची स्थापना करण्यात आली आहे. पक्षांतर्गत शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार या समितीला असणार आहेत.
महापालिकेत दुसऱ्यांदा भाजपची सत्ता येऊन नऊ महिन्यांचा कालावधी झाला आहे. सत्ता येताच विविध पदांसाठी नगरसेवकांमध्ये सत्ता संघर्ष अधिक तीव्र झाला. यातून भाजपमध्ये गटा-तटाचे राजकारण वाढले असून काही नगरसेवकांकडून पक्षविरोधी भूमिका घेतली जात आहे. पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी, समन्वयाच्या अभावमुळे पक्षाची प्रतिम मलिन होत असल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरात येऊन पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. संघटना आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवावा. सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावेत, असा कानमंत्र दिला होता. आता पदाधिकाऱ्यांमधील गटबाजीवर नियंत्रण आणि पक्ष शिस्त रहावी, यासाठी अनुशासन समितीची स्थापना केली आहे.
समितीत सहा जणांचा समावेश
शहर भाजपच्या अनुशासन समितीमध्ये आमदार उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, संघठन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, सरचिटणीस विकास डोळस आणि ॲड. गोरखनाथ झोळ यांचा समावेश आहे. पक्षांतर्गत शिस्त न पाळणे, पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे किंवा पक्षविरोधी भूमिका घेणे, अशा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे अधिकार या समितीला दिले आहेत.
शहराध्यक्षांनी प्रभावी काम केले नाही
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डाॅ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अपेक्षित काम केले नसल्याचा आरोप भाजपचे माजी चिटणीस सचिन काळभोर यांनी केला आहे. प्रचारात केवळ दिखाऊपणा करण्यात आला, प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे. याची दखल घेऊन दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे पत्राद्वारे केली आहे.
पक्ष संघटना सुरळीत चालावी, संघटनेचा विस्तार व्हावा आणि निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी खोट्या प्रचाराला बळी न पडता पक्षाचे काम जोमाने करावे, यासाठी पक्षांतर्गत शिस्त आवश्यक आहे. ही शिस्त अधिक बळकट करून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने अनुशासन समितीची स्थापना केली असल्याचे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
