पिंपरी : पिंपरीतील एका चॅरिटेबल ट्रस्टच्या मूळ विश्वस्तांच्या बनावट सह्या करून खोटे दस्तऐवज तयार करत धर्मदाय आयुक्त कार्यालयात बदल अर्ज सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट दस्तऐवजांच्या आधारे मूळ विश्वस्तांना डावलून नवीन विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या माजी प्रदेश महिला पदाधिकार्यासह तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भाजपमध्ये असलेल्या एका माजी नगरसेवकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला भाजप ओबीसी मोर्चाच्या माजी प्रदेश पदाधिकारी आहेत. फिर्यादी हे २००७ साली पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. सध्या ते सुद्धा भाजपमध्ये आहेत.
पिंपरीतील रहिवाशांनी मिळून एक मंदीर बांधून मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. मंदिराच्या देखभालीसाठी २००६ साली मंदिर देखरेख समिती स्थापन केली आहे. मंदिराचे नामकरण करून त्याची धर्मदाय आयुक्त, पुणे यांच्याकडे २९ एप्रिल २००६ रोजी नोंदणी करण्यात आली आहे. फिर्यादी यांच्यासह चारजण हे विश्वस्त आहेत. आरोपीची सर्वसंमतीने अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच एकजण सचिव होते. मात्र, अध्यक्ष यांनी सुरुवाती पासून नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्टच्या नियमा प्रमाणे कार्यवाही न करता ट्रस्टचा कारभार एक हाती राबवला. इतर विश्वस्तांना विश्वासात न घेता मनमानी कारभार चालवत होते.
मंदिराच्या दानपेटीतील पैसे कोणालाही न सांगता परस्पर घरी नेत असत. ट्रस्टची मौल्यवान धातूची भांडी, समई, चांदीचे ताट असे साहित्य ते घरी घेवून गेले. त्यांच्या अरेरावी व हुकुमशाही पद्धतीच्या कारभारामुळे विश्वस्तांमध्ये नाराजी पसरली. त्यांनी हिशोब मागितल्यावर विश्वस्तांची कोणतीही सभा न बोलविणे, नियमाप्रमाणे धर्मदाय आयुक्त कार्यालयात ताळेबंद सादर न करणे अशा अनेक बाबी करु लागले. सन २०२० मध्ये करोना संकटकाळात आपसात संगनमत करुन धर्मदाय आयुक्त कार्यालयात ट्रस्ट संबंधी बदल अर्ज दाखल करून आरोपीने पत्नीसह मर्जीतील इतर पाच नवीन व्यक्तींची परस्पर नियुक्ती करण्यात आली. मुळ विश्वस्तांची महत्वाची पदे काढून नवीन व्यक्तींना देण्यात आली.
ही नियुक्ती करतांना ट्रस्टच्या नियमांना बगल देत, कोणतीही अधिकृत बैठक न घेता, मूळ विश्वस्तांना कोणतीही माहिती न देता, खोट्या व बनावट दस्तऐवजांच्या आधारे बदल अर्ज सादर केला. नविन विश्वस्तांची नेमणुक व जुन्या विश्वस्तांचा राजीनामा याबाबत केलेल्या ठरावावरही खोट्या सह्या करण्यात आल्या. मुळ विश्वस्तांकडून कोणतीही संमती न घेता खोटे व बनावट ‘ना हरकत पत्र’ धर्मदाय आयुक्त यांच्यासमोर सादर करण्यात आले. त्यानंतर सर्व मुळ विश्वस्तांना कार्यकारीणीतून कायम स्वरूपी काढून टाकण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला. त्यावेळी फिर्यादींनी त्यास हरकत घेवून धर्मदाय आयुक्त कार्यालयात माहिती घेतली असता सर्व प्रकरण समोर आले. त्यानंतर फिर्यादीनी पिंपरी प्रथमवर्ग न्यायालयात या दाम्पत्याविरूद्ध तक्रार केली. न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कोरेगाव पार्क पोलीस तपास करीत आहेत.
