पिंपरी : पिंपरी कॅम्पात कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यासाठी गेलेल्या कॉपीराईट कंपनीच्या पथकासह पोलिसांच्या पथकाला व्यापार्‍यांनी तिव्र विरोध केला. सर्व व्यापार्‍यांनी या कारवाईला विरोध दर्शवित एकत्रित येत आपली दुकाने बंद केली. सुमारे तीन तास दुकाने बंद होती.

शहरात अनेक दुकानांमध्ये नामांकीत कंपन्यांचे नाव आणि लोगो वापरुन बनावट वस्तुंची सर्रासपणे विक्री केली जात आहे. बनावट लेबल व लोगोचा वापर करून कपडे, पादत्राणे, घड्याळे, चष्मे, सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, वाहनांचे पार्ट अशा विविध वस्तु बाजारामध्ये विकल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. ब्रॅण्डेड कंपनीच्या वस्तु दुय्यम दर्जा असलेल्या साहित्यापासून तयार करून ते ब्रॅण्डेड असल्याचे भासवले जाते. मात्र, ग्राहकांकडून किंमत

बॅण्डेड वस्तुचीच वसूल केली जाते. तर, काही दुकानदार ऑफरच्या नावाखाली सवलत असल्याचे सांगून बनावट वस्तु  निम्म्या किमतीत ग्राहकांना विक्री करताना दिसून येतात. पिंपरीतील साई चौक परिसरातील एका दुकानावर सोमवारी दुपारी कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार, कारवाई करण्यासाठी कॉपीराईट कंपनीच्या पथकासह पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिटचे पथक दाखल झाले. पथक कारवाईसाठी दुकानात जाताच व्यापार्‍याने कारवाईस विरोध दर्शविला. ही बाब इतर व्यापार्‍यांनाही समजली. त्यांनीही या दुकानाकडे धाव घेतली.

व्यापार्‍यांनी पथकाला कारवाईपासून रोखण्यासाठी दुकाने बंद करण्याचा पवित्रा घेतला. तत्काळ परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. व्यापार्‍यांच्या प्रचंड विरोधामुळे पथकातील अधिकारी आणि व्यापार्‍यांमध्ये वादावादी झाली. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. सुमारे तीन तास व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली होती. मात्र, व्यापार्‍यांच्या विरोधाला न जुमानता पथकाने कारवाईचा बडगा उगारला.

रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रीया सुरू होती, अशी माहिती पिंपरी पोलीसांनी दिली.दरम्यान, पिंपरी कॅम्पात गेल्या काही दिवसांपासून कॉपीराईटचा विनाकारण बागुलबुवा उभा करून व्यापार्‍यांची अडवणूक केली जात आहे. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता, केवळ भीती घालून पैसे उकळण्याच्या हेतूने ही पथके फिरत असल्याचा आरोप पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केला.