पिंपरी : अनैसर्गिक अत्याचार करून चाकूने गळा चिरून तीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची घटना चाकण परिसरात शुक्रवारी घडली. घटनेनंतर बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीन आरोपीला पुणे रेल्वे स्थानकावरून चाकण दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी खून झालेल्या मुलाच्या आईने दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी याबाबत माहिती दिली. खून झालेल्या मुलाची आई खालुंब्रे परिसरात मुलासह वास्तव्यास होती. ती मजुरीची कामे करते. शुक्रवारी दुपारी या महिलेचा तीन वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला. महिलेने परिसरातील शेती, नाल्यामध्ये मुलाचा शोध घेतला. पण, तो सापडला नाही. त्यानंतर पोलिसांना बोलविले. पोलिसांनी परिसरातील खोल्यांची तपासणी केली. त्यातील एक खोली बंद होती. पोलिसांनी दरवाजा तोडून या खोलीची तपासणी केली असता ‘सुटकेस’मध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला.
आरोपीने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर चाकूने गळा चिरून त्याचा खून करण्यात आला आहे. खोली बंद करून आरोपी तेथून पसार झाला. तो बिहारला जाण्याच्या तयारीत होता. पुणे रेल्वे स्थानकावरून त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी महिन्याभरापूर्वी एकटाच मजुरीसाठी चाकणमध्ये आला होता. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चाकण दक्षिण म्हाळुंगे पोलीस तपास करत आहेत.
