पिंपरी : मोशी परिसरात एका आलिशान मोटारीमधून बेकायदेशीररीत्या मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर पोलिसांनी कारवाई केली. आरोपी मोटारी मधून मद्य आणि रोख रक्कम घेऊन जात असताना रंगेहात सापडला. ही कारवाई रविवारी दुपारी बो-हाडेवाडी येथे करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई संदीप अश्रुबा सौदागार यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या आलिशान मोटारीतून विनापरवाना मद्य घेऊन जात होता. पोलिसांनी ४ हजार १७० रुपये किमतीचे मद्य, ५० हजार रुपये रोख आणि २६ लाख रुपये किमतीची अलिशान मोटार असा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

पिंपळे गुरव परिसरात घरबांधणीसाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. लोन प्रोसेसिंग आणि सिबिल क्लिअर करण्याच्या नावाखाली हे पैसे उकळण्यात आले. ही घटना २४ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत भालेकर नगर येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना गृहकर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी सिबिल आणि आयटीआर क्लिअर करण्याचे कारण सांगून तीन लाख रुपये स्वीकारले. प्रत्यक्षात कोणतेही कर्ज न देता आरोपींनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने एका बंद पडलेल्या बँकेचा धनादेश फिर्यादीला दिला. अशाप्रकारे फिर्यादीची २ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

सहाव्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

रावेत येथील एका बांधकाम साईटवर सहाव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. सुरक्षा जाळी आणि सेफ्टी बेल्ट निकृष्ट दर्जाचे असल्याने हा अपघात घडला. ही घटना १८ नोव्हेंबर २०२५ रोजी रावेत येथे घडली. विक्रम कुमार यादव असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र विक्रम कुमार यादव हा सेंट्रींगच्या प्लेट जोडण्याचे काम करत असताना त्याचा तोल जाऊन तो डक्टमध्ये पडला. त्यावेळी त्याचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि तो सहाव्या मजल्यावरील सुरक्षा जाळीवर पडला. मात्र, जाळी निकृष्ट दर्जाची असल्याने ती फाटली आणि विक्रम थेट खाली पडला. डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पुरेशी सुरक्षा खबरदारी न घेतल्याने हा अपघात झाला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रावेत पोलीस तपास करत आहेत.

भरधाव मोटारीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

रस्ता ओलांडणाऱ्या एका ५३ वर्षीय व्यक्तीला भरधाव मोटारीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने हा भीषण अपघात घडला. ही घटना बुधवारी (३१ डिसेंबर) रात्री औंध रस्त्यावर घडली. याबाबत २८ वर्षीय तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील एजाज इब्राहिम बागवान हे रस्ता ओलांडत असताना आरोपीने आपली मोटार अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

वाहन चोरी प्रकरणी एकास अटक

नवी सांगवी परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ४ जानेवारी रोजी सकाळी स्वामी विवेकानंद नगर येथे उघडकीस आली. या प्रकरणी संजय परशुराम मडिवालकर (४०, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किशोर गजानन पवार (२६, पिंपळे गुरव) या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची यामाहा दुचाकी राहत्या घरासमोर लॉक करून पार्क केली होती. आरोपीने फिर्यादीची संमती न घेता लबाडीच्या हेतूने ही दुचाकी चोरून नेली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले आणि अटक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

पवना नदीकाठी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

पिंपळे सौदागर येथे नदीपात्राजवळ झाडाखाली जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (४ जानेवारी) रात्री करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हवालदार शैलेश मधुकर काळभोर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून एक लाख ८६ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींना नोटीस देण्यात आली असून सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.