गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा चालू आहे. एकाकडे लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. मात्र, दुसरीकडे अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली. त्यानुसार नाना काटे यांना राष्ट्रवादीनं उमेदवारीही जाहीर केली. मात्र, त्यापाठोपाठ आता मविआसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. कारण स्थानिक प्रभावी नेते राहुल कलाटेंनी अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे.
नेमकं काय घडतंय पिंपरी-चिंचवडमध्ये?
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्यासमोर राहुल कलाटे आणि नाना काटे या दोघांनीही चांगली टक्कर दिली होती. त्यावेळीही राहुल कलाटे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हा राहुल कलाटेंना १ लाख १२ हजार मतं मिळाली होती. त्याच जोरावर यंदा उमेदवारीसाठी आपला विचार होईल, अशी शक्यता राहुल कलाटेंना वाटत होती. मविआमध्ये जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं मागून घेतली होती. त्यानुसार राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा कलाटेंना होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कलाटेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.
“मी असलं घाणेरडं राजकारण कधीही…”, बाळासाहेब थोरात प्रकरणावर नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया!
“मला अपेक्षा होती, पण…”
दरम्यान, राहुल कलाटेंनी काटेंना दिलेल्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली आहे. टीव्ही ९ शी बोलताना कलाटेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “शेवटच्या क्षणापर्यंत मला अपेक्षा होती की मागील ट्रॅक रेकॉर्ड पाहून किंवा या शहरातल्या जनतेनं २०१४ आणि २०१९मध्ये कुठल्या उमेदवारावर भरभरून प्रेम केलंय, ते पाहाता महाविकास आघाडी निर्णय घेईल अशी मला अपेक्षा होती. पण आता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे”, असं राहुल कलाटे म्हणाले आहेत.
“मला १०० टक्के विजयाची खात्री आहे. २०१९लाही १ लाख १२ हजार लोकांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. आता त्यापेक्षाही जास्त प्रमाणात लोक माझ्यासोबत राहतील.माझी सुरुवातीपासून भूमिका अशी होती की महाविकास आघाडीत कुणालाही जागा गेली, तरी ही निवडणूक मी लढवेन. कारण मागील इतिहास पाहिला आणि या शहरात माझा गेल्या ५ वर्षांत झालेला जनसंपर्क, कोविड काळातील माझं काम पाहाता मला अपेक्षा होती की महाविकास आघाडीकडून माझ्या नावाचा नक्कीच विचार होईल”, असंही राहुल कलाटे यांनी सांगितलं आहे.
कायद्यानुसार सत्यजित तांबे यांना अपक्षच राहावे लागणार
“जिंकल्यावर मी उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घ्यायला जाणार”
“मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. २०१९मध्ये या शहरातील कोणताही नेता, कार्यकर्ता चिंचवड विधानसभा लढवायला तयार नव्हता. त्यावेळीही मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. १ लाख १२ हजार लोकांनी मला मत दिलं. त्यांच्याही माझ्याकडून काही अपेक्षा असतील. तुम्हाला काही दिवसांत ते चित्र दिसेलच.विजयानंतर मी उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे”, अशा शब्दांत राहुल कलाटेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.