पिंपरी : मागील सहा वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांवर आणखी पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. आजपासून १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पवना धरणातून ५५० एमएलडी ऐवजी ४७५ एमएलडी पाणी महापालिकेला एका दिवसाला मिळणार आहे. पवना धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्‍यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. शहरासह नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) पवना धरणातून पाणी दिले जाते. महापालिका पवना धरणातून सोडलेले पाणी पवना नदीवरील रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातून उचलते. दररोज ५५० दशलक्ष लीटर (एमएलडी) अशुद्ध पाणी उपसा करून ते प्राधिकरण, निगडी येथील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. येथे शुद्धीकरण प्रक्रिया करून संपूर्ण शहराला जलकुंभाद्वारे पाण्याचे वितरण केले जाते. आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधारा येथून दररोज ९० दशलक्ष लीटर उचलले जाते. या पाण्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. तेथून जलकुंभाद्वारे समाविष्ट भागाला पाणी वितरित केले जाते.

पवना धरणातील साठा १९ टक्क्यांवर

प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. धरणात आजमितीला १९ टक्के पाणीसाठा आहे. धरणाचे पात्र कोरडे पडले आहे. तेथून शेतकरी गाळ काढून नेत आहेत. हे पाणी ३१ ऑगस्ट पर्यंत पुरविण्याचे नियोजन आहे. आंद्रा धरणातील पाणीसाठाही घटला आहे.

पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार पाणी कपात

पाटबंधारे विभागाने उपलब्धता पाणीपुरवठा नियोजन करण्यासाठी महापालिकेला १५ टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठामध्ये १५ टक्के कपात करण्यात आली आहे.

भामा आसखडचे काम संथगतीने

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी आणण्याचे महापालिकेने हाती घेतलेले काम संथगतीने सुरु आहे. डिसेंबर २०२४ मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन असताना अशुद्ध जलउपसा केंद्र, पंपिंग स्टेशन, जलवाहिनीची कामे अद्यापही सुरू आहेत. ठेकेदाराला दिलेल्या एक वर्षाच्या (डिसेंबर २०२५) मुदतीतही काम पूर्ण होणार नसल्याने आता प्रकल्पास मार्च २०२६ चा नवीन मुहूर्त ठरविण्यात आला आहे.

सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा

सर्वांना मुबलक व पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये काही दिवसांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. काही दिवसांसाठीचा एक दिवसाआडचा पाणीपुरवठा पुढे कायम ठेवण्यात आला आहे. सहा वर्षे होत आले, तरी एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरातील विविध भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. वाढीव पाणी मिळत नाही, तोपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासन सांगत आहे.