पिंपरी-चिंचवड शहरात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोशल डिस्टंसिंगसह मास्कचा वापर आदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १६ हजार ४०० पेक्षा अधिक नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे.  मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्या आणि ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ दुकानं उघडी ठेवणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

देशासह राज्यात मार्च महिन्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती.  करोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी खबरदारी म्हणून केंद्र, राज्य शासनाने ही पाऊले उचलली होती. परंतु, काही नागरिकांनी नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कलम १८८ नुसार कारवाई केली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर  करोनाच्यादृष्टीने रेडझोनमधून वगळण्यात आल्यानंतर कारवाईचा वेग वाढवण्यात आला होता. शहरातील बहुतांश भागात गर्दी आणि सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. तेव्हा देखील नागरिकांवर कारवाई करण्यात आली. दररोज किमान शेकडो नागरिकांवर ही कारवाई केली जात आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त यांनी दिली आहे.

पोलीस आयुक्तालयात एकूण- ३६० कंटनमेंट झोन असून या परिसरात आस्थापने, खुली करण्यास बंदी अद्यापही लागू आहे. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी असून ज्या ठिकाणी करोना बाधितांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. तिथे खबरदारी म्हणून जनजागृती केली जाणार आहे. अस अप्पर पोलीस आयुक्त यांनी सांगितले आहे.