scorecardresearch

पिंपरी-चिंचवड : …म्हणून अभिनेत्री आर्या घारे हिने चक्क स्मशानभूमीत साजरा केला स्वत:चा वाढदिवस..!

ही कल्पना आईला सुचली असल्याचेही सांगितले; वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्र, कुटुंबीय उपस्थित होते

पिंपरी-चिंचवड : …म्हणून अभिनेत्री आर्या घारे हिने चक्क स्मशानभूमीत साजरा केला स्वत:चा वाढदिवस..!

पिंपरी-चिंचवडमधील अभिनेत्री आर्या घारे हिने आपला वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा केला आहे. याद्वारे घारे कुटुंबियांनी अंधश्रद्धेचा निषेध करत नवीन विचारांचा पायंडा पाडला. त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे. आर्या घारे हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्र, कुटुंबीय उपस्थित होते. आर्या हिने देऊळबंद, पोश्टर गर्ल, भिरगीट, अ.ब.क, बॅक टू स्कूल, परफ्युम, 66 सदाशिव अशा चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
आर्या घारे व तिची आई वैशाली घारे या अंधश्रद्धा, रूढी परंपरा दूर सारण्यासाठी नेहमीच पुढे असतात. त्यामुळेच दरवर्षी आर्या हिचा वाढदिवस अशाच अभिनव उपक्रमातून साजरा केला जातो. आज स्मशानभूमीत साजरा झालेला वाढदिवस हा देखील अशाच एका परिवर्तनवादाचा दृष्टिकोन असल्याचे आर्याची आई वैशाली घारे यांनी सांगितले.

ही संकल्पना आईला सुचली –

“अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करावा, ही संकल्पना आईला सुचली. दरवर्षी वेगळ्यापद्धतीने वाढदिवस साजरा करणाऱ्या आईचा मला अभिमान वाटतो.” असे आर्या घारे यावेळी म्हणाली.

…मग स्मशानभूमी अपवित्र कशी? –

पुढे ती म्हणाली की, “अंधश्रद्धेवर अनेक लोक खूप विश्वास ठेवत आहेत. नागपुरात पाच वर्षीय चिमुरडीला अंधश्रद्धेपायी जीव गमवावा लागला. अशा घटना ऐकल्यानंतर आपण वाहून जातोय अस वाटलं. म्हणून अशा गोष्टींना तडा देण्यासाठी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याच ठरवलं. श्रीमंत असो किंवा गरीब त्याचा शेवट हा इथेच होतो. स्मशानभूमी हेच अंतिम सत्य आहे. इथून देहाला मुक्ती मिळते, मग स्मशानभूमी अपवित्र कशी?, तरुणांनी पुढे येऊन अंधश्रद्धा थांबवली पाहिजे, श्रद्धा असू द्या पण ती अंध नसावी.” असं देखील आर्या म्हणाली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या