पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांची संख्या वाढत असतानाच वाहतूक काेंडीची समस्या गंभीर हाेत असल्याने चौकातील कोंडी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनुकूलनक्षम वाहतूक नियंत्रण प्रणालीचा (अडॅप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीत वाहतूक नियंत्रण दिव्याचे (सिग्नल) नियंत्रण कृत्रिम प्रज्ञेच्या हाती राहणार आहे. दिव्यांची वेळ वाहनांच्या गर्दीनुसार बदलणार आहे. मोशीतील दोन चौकांत याची प्रायाेगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लाेकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात ३० लाख ७५४ वाहने असल्याचा दावा महापालिकेच्या सन २०२५-२६ च्या पर्यावरण अहवालात करण्यात आला आहे. लाेकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. महत्त्वाच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूककाेंडीला सामोरे जावे लागत आहे. प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल अशी ओळख असलेल्या शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. वाहतूक नियंत्रण दिवे असतानाही चौकात कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी चौकातील दिव्यांवर अनुकूलनक्षम वाहतूक नियंत्रण प्रणाली बसविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विद्युत विभागाला दिल्या होत्या.

त्यानुसार विद्युत विभागाने पुणे-नाशिक महामार्गावरील काेंडीच्या माेशी गावठाण आणि भारतमाता या दाेन चाैकांत एका संस्थेच्या माध्यमातून पुढील पंधरा दिवसांत कृत्रिम प्रज्ञाधारित अनुकूलनक्षम वाहतूक नियंत्रण प्रणाली बसविली जाणार असून, सात दिवस चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील कोंडी होणाऱ्या चौकातील दिव्यांवर ही यंत्रणा बसविली जाणार असल्याचे विद्युत विभागाने सांगितले आहे.

शहरात १५४ वाहतूक नियंत्रण दिवे

शहरात बारा फुटांपासून ८० फूट रुंदीचे पक्के, कच्चे असे दाेन हजार ७३ किलाेमीटर अंतराचे रस्ते आहेत. ३३ पूल, उड्डाणपूल असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध रस्त्यांवरील चौकांत १५४ वाहतूक नियंत्रण दिवे बसविले आहेत.

प्रणालीत काय?

अनुकूलनक्षम वाहतूक नियंत्रण ही एक स्वयंचलित आणि अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आहे. यामध्ये वाहतूक दिव्यांची वेळ रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीनुसार बदलते. त्यामुळे रस्त्यांवर हाेणारी वाहतूककाेंडी नियंत्रणात राहण्यास मदत हाेते.

वाहतूककोंडी होणारी ठिकाणे

मुकाई चौक, गोडाऊन चौक, मोरवाडी चौक, भारतमाता चौक, खंडोबा माळ चौक, बोऱ्हाडेवस्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, नाशिक फाटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी चौक, भुजबळ चौक, तळवडे चौक, भूमकर चौक, काशीद पार्क, भोसरी बसस्थानक, चिखली चौक, देहू फाटा, निगडीतील टिळक चौक, डांगे चौकात वाहतूककोंडी होते.

गर्दीच्या रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी ही प्रणाली बसविण्यात येणार आहे. यामुळे गर्दीची ठिकाणे व वेळेचा अभ्यास करत दिव्यांची वेळ कमी-अधिक केली जाईल. त्यामुळे कोंडी सुटेल. माेशीतील गर्दीच्या दाेन चाैकांत याची चाचणी घेतली जाणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्व चौकांत टप्प्या-टप्प्याने ही यंत्रणा बसविण्यात येईल. यासाठी यापूर्वीच विविध चाैकांत बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर करण्याचे नियाेजन असल्याचे विद्युत विभागाचे सह शहर अभियंता महेश कावळे यांनी सांगितले आहे.