पिंपरी : ‘राज्यात कृत्रिम प्रज्ञा (एआय) आधारित ‘तपास सारथी’ सुरू असून, घटना घडताच न्यायवैद्यक पुरावे जमा केले जातात. हे पुरावे ‘ब्लॉकचेन’मध्ये घेतले जातात. तपास सुरू झाल्यापासून न्यायालयात खटला दाखल होईपर्यंत पुराव्यांचे व्यवस्थापन ‘ब्लॉकचेन’च्या माध्यमातून तयार केले जात आहे. आरोपपत्र तयार करणे, जबाब घेणे याचे चित्रीकरण केले जाते. या माध्यमातून गुन्हेगारीवर वचक बसविण्यात येत आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी ताथवडे येथे झालेल्या जागेच्या सात-बारा उताऱ्याचे हस्तांतरण, कृत्रिम प्रज्ञा आधारित सीसीटीव्ही व आयटीएमएस प्रकल्पाचा शुभारंभ, पिंपरी पोलीस संकुलाचे भूमिपूजन, आधुनिक वाहने, साधनसामग्रीचे लोकार्पण, नशामुक्त अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी झाला. त्या वेळी ते बोलत होते. आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माधुरी मिसाळ, महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, बाबाजी काळे, सुनील शेळके, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे या वेळी उपस्थित होते.
‘नसरापूरमध्ये लहान मुलीवर झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला सर्वांत कमी वेळेत शिक्षा झाली. या घटनेत कृत्रिम प्रज्ञेने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विश्लेषण करण्यात आले. तो महत्त्वाचा पुरावा ठरला. त्यामुळे पोलीस न्यायालयात पुरावे देऊ शकले. कृत्रिम प्रज्ञा आधारित सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूककोंडी, गर्दी नियंत्रण, गुन्हे नियंत्रण करणे सोपे होईल,’ असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ‘पोलिसांच्या ११२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत प्रतिसाद मिळत आहे.
प्रतिसाद देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्रात पिंपरी-चिंचवड पहिल्या क्रमांकावर आहे. घटना घडत असताना, त्यापूर्वीच पोलीस पोहोचत आहेत. याच्या डिजीटल नोंदी होत आहेत. त्यामुळे कोणालाही खोटे बोलता येत नाही. कृत्रिम प्रज्ञा आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे स्त्यावरील गुन्हेगारी पूर्णपणे नियंत्रणात आणली जात आहे. या यंत्रणेमुळे दोषींना शिक्षा देण्याचे प्रमाण वाढले आहे. पुरावे जमा करुन त्याचे विश्लेषण केले जाते. त्यातून शिक्षा दिली जाते,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘शहरात औद्योगिक वसातही येतात. कोणी दादागिरी करु नये. चोऱ्या होऊ नयेत. यासाठी कृत्रिम प्रज्ञा आधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने गुन्हेगारीत घट होईल,’ असेही ते म्हणाले.
शंभरपैकी ७० गुन्हेगारांना शिक्षा
‘केंद्र सरकराच्या नवीन कायद्यामुळे गुन्हेगारी न्याय प्रणालीत गुन्हात्मक बदल झाला आहे. गुन्हेगारांना दोनपेक्षा जास्त तारखा मागता येत नसल्याने तत्काळ शिक्षा सुनावली जाते. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसत आहे. सन २०१२ मध्ये पोलिसांनी पकडलेल्या शंभर गुन्हेगारांपैकी सरासरी १३ जणांना शिक्षा होत होती. ८७ गुन्हेगार सुटत होते. आता शंभरपैकी ७० गुन्हेगारांना शिक्षा होते. हे प्रमाण ९० पर्यंत गेले पाहिजे. न्याय वेळेत मिळाला पाहिजे,’ असेही फडणवीस म्हणाले. पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पुढील पंधरा वर्षात पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या जास्त असणार आहे. त्यासाठी शहरी नियोजन करावे लागणार असल्याचेही ते म्हणाले.
