पिंपरी : मावळ तालुक्यातील आंद्रा धरणातून जलवाहिनीद्वारे शंभर दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धरणाच्या वरील भागात जॅकवेल उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला ९५ गुंठे जागा देण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. या जागेपोटी महापालिका तीन कोटी तीन लाख रुपये देणार आहे. जागेचा प्रश्न सुटल्याने आता जॅकवेलसह बंदिस्त जलवाहिनीच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून, या प्रकल्पामुळे शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळेल, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातील शंभर दशलक्ष लिटर पाणी आरक्षित आहे. जॅकवेलसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने आणि जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत महापालिकेने तळवडेजवळील निघोजे येथील इंद्रायणी नदीच्या बंधाऱ्यावरून अशुद्ध पाणी घेण्याचा निर्णय घेतला. तेथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून दररोज ९५ दशलक्ष लिटर पाणी उचलण्यात येत आहे. या पाण्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून समाविष्ट भागाला जलकुंभाच्या माध्यमातून वितरित केले जाते.

या पार्श्वभूमीवर, महापालिकेने थेट आंद्रा धरणातून पाणी उचलण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या जॅकवेलसाठी जलसंपदा विभागाकडून धरणाजवळच्या जागेची मागणी करण्यात आली होती. जलसंपदा विभागाने ९५ गुंठे जागा देण्यास नुकतीच मान्यता दिली. ‘जागा ताब्यात येताच जॅकवेल, बंदिस्त जलवाहिनीच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली जाईल. धरणाच्या वरील भागात जॅकवेल असल्याने आवश्यकतेनुसार पाणी उचलता येईल,’ असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

दोन वर्षांत काम पूर्ण

आंद्रा धरणापासून तळेगाव ‘एमआयडीसी’तील नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची बंदिस्त जलवाहिनी टाकली जाणार आहे. ते अंतर ८.८ किलोमीटर इतके आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला शंभर एमएलडी स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावरील प्रकिया करण्याच्या खर्चात मोठी बचत होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

भामा आसखेड’साठी ११ निविदा

भामा आसखेड पाणी योजनेचे उर्वरित ३० टक्के काम पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने अल्प मुदतीची निविदा प्रसिद्ध केली होती. धरणापासून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची बंदिस्त जलवाहिनीचे काम करण्यासाठी पाच ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. हे काम ३३ कोटी ३५ लाख रुपयांचे आहे. तर, ब्रेक प्रेशर टँकपासून देहूपर्यंत १४०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या कामासाठी सहा ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या असून, ५० कोटी ६९ लाख रुपये खर्चाचे हे काम आहे. एकूण ८४ कोटी चार लाख रुपयांच्या या दोन निविदा आहेत. जलसंपदा विभागाने आंद्रा धरणाच्या वरील बाजूस ९५ गुंठे जागा महापालिकेसाठी मंजूर केली आहे. तेथे जॅकवेल उभारण्यात येणार आहे. तेथून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत बंदिस्त जलवाहिनी टाकली जाणार आहे. या दोन्ही कामांच्या निविदा तयार आहेत. जागा ताब्यात आल्यानंतर निविदा प्रसिद्ध करण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले.