पिंपरी : भामा आसखेड पाणी योजनेच्या भूमिगत जलवाहिनीचे काम वेगात सुरु आहे. जानेवारी २०२७ अखेर पिंपरी-चिंचवड शहराला अतिरिक्त १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) स्वच्छ पाणी उपलब्ध होईल. आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी आणण्याच्या कामासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाईल. पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत कार्यवाही सुरू आहे,’ असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
पाणीकपात जलसंपदा विभागाने केली आहे. परंतु, कपातीपूर्वी जेवढे पाणी उचलले जात होते, तेवढेच आताही उचलले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून शहरासाठी १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येणार आहे. चारवेळा मुदतवाढ आणि सूचना देऊनही संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही. हा प्रकल्प नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मुदतवाढ संपूनही ३० टक्के काम शिल्लक राहिल्याने महापालिकेने ठेकेदाराला बडतर्फ केले. दोन नवीन ठेकेदारांची नियुक्ती केली. भामा आसखेड धरणापासून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टाकीपर्यंत १७०० मिलीमीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनीचे उर्वरित आणि ब्रेक प्रेशर टाकीपासून तळवडे व देहूपर्यंतच्या १४०० मिलिमीटर जलवाहिनीचे उर्वरित काम वेगात सुरु आहे.
इंद्रायणी नदीच्या खालून जलवाहिनी
तीर्थ क्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीपात्राच्या खालून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. नदीतील पाण्याच्या पातळीपासून २५ फूट खाली मातीचा भराव टाकण्यात आला. त्यानंतर जलवाहिनी टाकण्यात आली. पाऊस पडण्यापूर्वी नदीपात्रातील काम पूर्ण झाले आहे.
साडे सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
सर्वांना मुबलक व पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये काही दिवसांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. काही दिवसांसाठीचा एक दिवसाआडचा पाणीपुरवठा पुढे कायम ठेवण्यात आला आहे. साडे सहा वर्षे पूर्ण झाली, तरी एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. वाढीव पाणी मिळत नाही, तोपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासन सांगत आहे.
शहराची लोकसंख्या ३८ लाख, दिवसाला ६५० एमएलडी पाण्याची आवश्यकता
पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येला शुद्ध, सुरक्षित आणि अखंड पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पवना धरण ते सेक्टर २३, निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पवना धरणातील पाणी प्रदूषणमुक्त व विश्वासार्ह पद्धतीने थेट जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३८ लाख असून दररोज सुमारे ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये पवना नदीतून ५२० एमएलडी, इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी आणि एमआयडीसीमार्फत ३० एमएलडी पाणी उपलब्ध होते. सध्याची पाण्याची मागणी ६५५ एमएलडी असून मंजूर पाणी आरक्षण ७७६ एमएलडी आहे. लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता हे आरक्षण २०२९ पर्यंत पुरेसे राहील, असा अंदाज आहे.
शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा
पवना धरण – ५५० दशलक्ष लीटर
आंद्रा धरण – ८० दशलक्ष लीटर
एमआयडीसी – २० दशलक्ष लीटर
एकूण – ६५० दशलक्ष लीटर
