पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव वेळोवेळी दिसून आला आहे. त्यामुळे महापौरांना आपले निर्णय माघारी घेऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. याची दखल घेऊन पक्षाच्या प्रदेश समितीने कोअर कमिटीत फेरबदल केले असून

शहर पातळीवर पक्षाचे धोरण ठरवणे, संघटनात्मक निर्णय घेणे आणि पक्षांतर्गत शिस्तपालन असे अधिकार कमिटीला आहेत. कोअर कमिटीच्या मान्यतेशिवाय किंवा चर्चेविना पदाधिकारी व नगरसेवकांनी कोणत्याही विषयावर माध्यमांसमोर किंवा जाहीरपणे प्रतिक्रिया देऊ नये, असा आदेश आहे. महापालिकेचे कामकाज किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार या कमिटीला आहे. पक्षासाठी व संघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे योगदान पाहूनच त्यांना महत्त्वाची पदे किंवा जबाबदाऱ्या देण्याचा अधिकार कमिटीला आहे.

महापालिकेतील कामकाजातील पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील गोंधळामुळे सत्ताधारी भाजपची बदनामी होत आहे. महापौर रवी लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे या तिन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे वारंवार उघड झाले.  महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा दप्तरी दाखल केलेला प्रस्ताव महापाैर लांडगे यांनी ऑगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेसमाेर घेतल्याचे भाजपमध्ये तीव्र पडसाद उमटले. त्यातून महापाैरांचा विराेध असतानाही ऑगस्ट महिन्याची सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. यावेळी शितोळे यांनी महापौरांवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना शहर विकासाचे काही घेणेदेणे नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. भाजपची बदनामी होत असल्याच्या प्रकाराची भाजप प्रदेश समितीने गंभीर दखल घेतली.  त्यानुसार कोअर कमिटीतून शितोळे यांची उचलबांगडी केली.

महापालिकेचे कामकाज सुरळीत चालावे. शहर विकासाबाबत पदाधिकार्‍यांनी समन्वय ठेवून कामकाज करावे. आपल्या वर्तनातून पक्षाची प्रतिमा मलिन होऊन नये, दक्षता घ्यावी, अशा सूचना महापालिका पदाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत, असे भाजपचे शहराध्यक्ष तथा कोअर कमिटी सदस्य शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

कोअर कमिटीत ‘यांचा’ समावेश

कोअर कमिटीत १४ जणांचा समावेश आहे. यामध्ये पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, पक्षाचे प्रभारी भरत पाटील, शहर कार्यकारिणी सरचिटणीस वैशाली खाडये, मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांचा समावेश आहे.