पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरासाठी किमान ७५,००० पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पक्षाने निश्चित केले आहे. लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधरांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. या कामातील सहभागाचा उपयोग भविष्यात पदांच्या वाटपावेळी निकष म्हणून केला जाणार असल्याचे’, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

पदवीधर मतदार नोंदणी, मतदारयादी विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा चव्हाण यांनी रविवारी कासारवाडी येथे घेतला. प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, राजेश पांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, शंकर जगताप, अमित गोरखे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, पदवीधर नोंदणी प्रमुख राजेश पिल्ले यावेळी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात पदवीधर मतदानाची टक्केवारी वाढवणे हे आपले महत्त्वाचे ध्येय आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे. नगरसेवक आणि संघटना हे वेगळे घटक नसून सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. शहरासाठी किमान ७५,००० पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पक्षाने निश्चित केले आहे. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधरांची नोंदणी करणे अनिवार्य आहे.

केवळ नोंदणी करणे पुरेसे नसून, त्यासाठीची अचूक कागदपत्रे आणि ‘हार्ड कॉपी’ कार्यालयात वेळेत जमा करण्याची जबाबदारी संबंधितांवर सोपवण्यात आली आहे. या कामाच्या प्रगतीचा दररोजचा आढावा घेण्यासाठी एक विशेष ‘चार्ट’ तयार करून तो जिल्हा अध्यक्ष आणि गटनेत्यांकडे सादर करावा. येत्या २० ऑगस्टपर्यंत ही मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.’

महाराष्ट्रात १ लाख रक्तदानाचा संकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख रक्तदानाचा संकल्प पक्षाने केला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या उपक्रमात पिंपरी-चिंचवडचा सहभाग म्हणून किमान ५,००० रक्तदानाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आहे. कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे मोठे फलक लावून किंवा अनावश्यक जाहिरातबाजी करून वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा, रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यात स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेत शहरातील सर्व ४ सरचिटणीस, १४ मंडळांचे अध्यक्ष, २० पदाधिकारी आणि १०५ सदस्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
या महाबैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले. सूत्रसंचालन संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी तर सरचिटणीस विकास डोळस यांनी आभार मानले.