पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये माजी नगरसेवक फोडण्यावरुन स्पर्धा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांसह दोन माजी नगरसेवकांना पक्षात घेतल्यानंतर आता भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह शिवसेना (ठाकरे) पक्षाला मोठा दणका दिला आहे. या पक्षातील माजी दोन उमहापौर, दोन माजी स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासह विविध पक्षातील १७ माजी नगरसेविकांनी आज (शनिवारी) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.  

अजित पवार यांनी भाजपच्या दोन माजी नगरसेविकांना फोडल्यानंतर स्थानिक भाजपनेही कंबर कसली होती. भाजपनेही राष्ट्रवादी काँग्रेसला फोडाफोडीने उत्तर देण्याची तयारी सुरु केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या माजी नगरसेवकांना पक्षात घेतले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, उषा वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, माजी नगरसेवक समीर मासूळकर, प्रसाद शेट्टी, प्रवीण भालेकर, जालिंदर शिंदे, माजी नगरसेविका आशा सूर्यवंशी, माजी महापौर महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपमधून शिवसेना (ठाकरे) पक्षात गेलेले माजी नगरसेवक रवी लांडगे पुन्हा स्वगृही परतले आहेत. याबरोबर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख, माजी महापौर संजोग वाघेरे,माजी नगरसेवक अमित गावडे, मिनल यादव, संजय काटे, काँग्रेसचे माजी नगरसेवक सद्गुरू कदम, सचिन सानप, सुखदेव नरळे, डॉ. सुहास कांबळे, अशोक मगर, नागेश गवळी यांनीही कमळ हाती घेतले आहे. अपक्ष माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांचाही प्रवेश झाला आहे.

अजित पवार यांच्यासमोर भाजपचे कडवे आव्हान

पिंपरी-चिंचवड शहर एके काळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला होते. मात्र, २०१७ मध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतली. भाजपचे तीनवरुन ७७ नगरसेवक झाले. शहरावर १५ वर्षे एकहाती राज्य करणाऱ्या पवार यांनी महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या पक्षाच्या बहुतांश माजी नगरसेवकांचीही युती व्हावी अशीच भूमिका होती. परंतु, शहर भाजपने स्वबळावर लढण्याचा आग्रह कायम ठेवला. त्यातून निवडणूक जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पवार यांच्यासमोर भाजपने कडवे आव्हान निर्माण केले आहे.

अजित पवार सर्वस्व पणाला लावणार

उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) सत्ता आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपमधील नाराज माजी नगरसेवकांवर जाळे टाकण्यास सुरुवात केली. भाजपच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांच्यासह शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक सचिन भोसले, शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांना पक्षात घेतला. भाजपचे सात ते आठ माजी नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा या पक्षाचा आहे.