पिंपरी : दापोडी, सांगवीसह पुणे-मुंबई मार्गावर दोन्ही बाजूंनी निर्माण होणाऱ्या इमारतींना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा हाेण्यासाठी शहरातील सर्वाधिक रहदारीचा मार्ग असलेल्या निगडी ते दापाेडी मार्गावर महापालिकेच्या वतीने बीआरटी मार्गातून नव्याने स्वतंत्रपणे भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या जलवाहिनीचे ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १८ टक्के काम चार महिन्यांत पूर्ण केले जाईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी, फुगेवाडी, सांगवी या भागांत, तसेच, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील नवीन गृहप्रकल्पांना पुरेसे पाणी मिळावे, म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून निगडीच्या पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून दापोडीपर्यंत एकूण १३ किलाेमीटर अंतरावर बीआरटी मार्गातून भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. एकूण ५२ कोटी ५४ लाख रुपयांच्या या कामाची मुदत दोन वर्षे असून, आतापर्यंत ८१.८० टक्के काम पूर्ण झाले आहे. कामाची मुदत संपण्यास चार महिने बाकी असून, मुदतीत काम पूर्ण करणार असल्याचे कार्यकारी अभियंता महेश बरिदे यांनी सांगितले.
शहरात दापोडी ते माेरवाडीपर्यंत मेट्रो धावत आहे. या मेट्राे मार्गामुळे चटई क्षेत्र निर्देशांक वाढल्याने महामार्गावर दाेन्ही बाजूंनी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. या निवासी इमारतींना या जलवाहिनीतून पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या इमारतींना पाण्याची समस्या भेडसावणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.
कोंडीत भर
मेट्राे, अर्बन स्ट्रीट आणि जलवाहिनीच्या कामांमुळे निगडी ते दापोडी सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक काेंडीत भर पडत आहे. जलवाहिनीच्या कामासाठी डंपर, ट्रक तसेच, अवजड वाहने सेवा रस्त्यावर थांबतात, तर खोदकामामुळे बीआरटी मार्ग बंद असल्याने पीएमपी बस सेवा रस्त्याने धावतात.
निगडी जलशुद्धीकरण केंद्रापासून दापोडी येथील जलकुंभापर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्यामुळे मार्गावरील लोकवस्तीला पाणी मिळणार आहे. शहराचे टोक असलेल्या दापोडी, सांगवी, फुगेवाडी या भागाला पुरेसे पाणी उपलब्ध होईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
